“काही ठिकाणी निवडणुका जिंकल्यावर काँग्रेसने EVMवर शंका घेतली नाही”; अमित शाह यांनी सुनावले
By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2024 11:14 AM2024-05-29T11:14:30+5:302024-05-29T11:14:52+5:30
Amit Shah News: ज्या ठिकाणी काँग्रेस जिंकतात त्या ठिकाणी कधीच ईव्हीएम खराब असल्याचे बोलत नाहीत. विरोधकांना पराभव दिसू लागला की, ईव्हीएमवर प्रश्न विचारतात, असे टीका अमित शाह यांनी केली.
Amit Shah News: देशाने गेल्या तीस वर्षांतील अस्थिर सरकारमुळे खूप काही सहन केले. हा सर्वांत वाईट काळ होता. अटलबिहारी वाजपेयी यांनी चांगल्या प्रकारे सरकार चालवले. यूपीए सरकार आल्यावर भारत देश जगाच्या शर्यतीमध्ये मागे पडला. गेल्या १० वर्षांत देशाने स्थिर सरकार पाहिले आहे त्यामुळे आताही आपल्याला ४०० पार हवे आहेत, असे केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते अमित शाह यांनी स्पष्ट केले.
दिल्लीत सर्व जागा भाजपा जिंकणार आहे. पंजाबमध्ये आम आदमी आणि काँग्रेस पक्ष स्वतंत्रपणे निवडणूक लढवत आहे. दिल्लीमध्ये स्वार्थासाठी युती केली आहे. ती आघाडी कोणत्या तत्त्वांवर आधारित असती तर ती संपूण देशभरामध्ये दिसली असती. पण हे काही ठिकाणी युती करत आहेत तर काही ठिकाणी एकमेकांविरूद्धच लढत आहेत, अशी टीका अमित शाह यांनी केली.
निवडणुका जिंकल्यावर काँग्रेसने EVMवर शंका घेतली नाही
पुढे अमित शाह म्हणाले की, काँग्रेसला नेमके काय म्हणायचे ते समजत नाही. कारण ते कधी मतदानाच्या टक्केवारीवर तर कधी ईव्हीएम मशीनवर प्रश्न उपस्थित करतात. ज्या राज्यांमध्ये काँग्रेसने निवडणुका जिंकल्या त्या ठिकाणी का नाही असा प्रश्न विचारला. आता नुकत्याच झालेल्या निवडणुकांनंतर हिमाचलमध्ये काँग्रेसने सरकार स्थापन केले. तेलंगणामध्ये विजय मिळवला. पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींनी सरकार स्थापन केले. या राज्यांमध्ये जिंकल्यावर का ईव्हीएममध्ये बिघाड असल्याचे काँग्रसने का म्हटले नाही, असा खोचक सवाल करत, ज्या ठिकाणी ते जिंकतात त्या ठिकाणी कधीच ईव्हीएम मशीन हे खराब असल्याचे बोलत नाहीत. मात्र त्यांचा पराभव झाला किंवा पराभव दिसू लागला की, ते ईव्हीएमच्या नावाने ओरडायला लागतात, या शब्दांत अमित शाह यांनी काँग्रेसवर सडकून टीका केली. अमित शाह टीव्ही ९ शी बोलत होते.
दरम्यान, हिमाचल प्रदेश असेल किंवा तेलंगणात असेल काँग्रेसने दिलेले एकही आश्वासन अद्यापपर्यंत पूर्ण केलेले नाही. राहुल गांधी यांची समस्या ही आहे की, ते अर्ध्या पानापेक्षा जास्त वाचू शकत नाहीत. अग्निवीरमधील असे आहे की, १०० पैकी २५ सैनिक कायमस्वरूपी होतील, बाकीच्यांना शासन, पोलीस दल आणि इतर सवलती देण्यात येतील, असे म्हणत अमित शाह यांनी राहुल गाधींना टोला लगावला.