भाजपाचे नेते विजय सिंह यांचा मृत्यू लाठीचार्जने झाला नसून हार्ट अटॅकने झाला आहे. पाटणा मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये करण्यात आलेले पोस्टमॉर्टम आणि त्याच्या हिस्टोपॅथॉलॉजिकल रिपोर्टनंतर याची पुष्टी झाली. रिपोर्टनुसार, विजय सिंह हृदयविकाराने ग्रस्त होते आणि दोन नसांमध्ये ब्लॉकेज देखील होते.
सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे याआधी पाटणा जिल्हा प्रशासनाने असा दावा केला होता की, लाठीचार्जमध्ये विजय सिंह जखमी झाले नाहीत आणि ते प्रत्यक्ष घटनास्थळापासून खूप दूर होते. गेल्या शुक्रवारी पाटण्यातील विविध मुद्द्यांवर भाजपा नेते आणि कार्यकर्ते बाहेर पडले होते. पोलिसांनी त्याला रोखलं. मात्र बॅरिकेडिंग तोडून ते पुढे जाऊ लागले तेव्हा पोलिसांनी त्यांच्यावर लाठीचार्ज केला.
लाठीचार्जमध्ये अनेक जण जखमी झाले. विजय सिंह यांचाही मारहाणीमुळे मृत्यू झाल्याचा आरोप भाजपाने केला आहे. संपूर्ण घटनेवर प्रतिक्रिया व्यक्त करताना, भाजपाचे अध्यक्ष जेपी नड्डा म्हणाले होते की, अलीकडेच पाटणा येथे पक्षाच्या नेत्यांनी केलेल्या निदर्शनादरम्यान पोलिसांनी केलेल्या बळाचा वापर बिहारमधील 'जंगलराज, अराजकता आणि राज्य सरकारची विरोधी पक्षांबद्दलची क्रूरता दर्शवते. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.