अहमदाबाद, दि. 5- गुजरातमधील बनासकांठा जिल्ह्यात काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या कारवर दगडफेक करणाऱ्या भाजपच्या स्थानिक नेत्याला पोलिसांनी अटक केली आहे. शनिवारी धनेरामधून त्या स्थानिक नेत्याला अटक करण्यात आलं आहे. जयेश दर्जी असं या नेत्याचं नाव असून तो बनासकांठाचा भाजपचा जिल्हा महामंत्री आहे. तसंच या प्रकरणी इतर तिघांना ताब्यात घेतलं आहे. दर्जी हा या घटनेतील मुख्य आरोपी असल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. राहुल गांधींच्या कारवरील हल्ल्याचा निषेध करण्यासाठी काँग्रेस कार्यकर्त्यांनी शनिवारी देशभरात ठिकठिकाणी निदर्शनं केली.
बनासकांठा येथे पूरग्रस्त लोकांना भेटण्यासाठी गेले असताना कारवर झालेल्या हल्ल्यावरून राहुल गांधी यांनी शनिवारी पत्रकारांशी बोलताना भाजपवर हल्लाबोल केला होता. या हल्ल्यामागे भाजप आणि आरएसएसचा हात असल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला. तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदींवरही त्यांनी निशाणा साधला होता. ज्यांनी हल्ले घडवून आणले तेच या हल्ल्याचा निषेध कसा करतील, असा आरोप त्यांनी मोदींवर केला होता. मोदी आणि आरएसएस-भाजपची राजकारणाची हीच पद्धत आहे, अशी टीकाही त्यांनी केली होती.
नेमकं काय घडलं ?गुजरात दौ-यावर असलेल्या राहुल गांधी यांच्या गाडीवर धनेरा येथील लाल चौकात हा हल्ला करण्यात आला . काँग्रेसने या हल्ल्यामागे भाजपा कार्यकर्ता असल्याचा आरोप केला. भाजपाने मात्र हे आरोप फेटाळून लावत काँग्रेसला आमच्यावर आरोर करायची सवय झाली आहे असं म्हटलं. पूरग्रस्त गुजरातच्या दौऱ्यावर असताना काही लोकांनी राहुल गांधी यांना काळे झेंडे दाखवले होते. तसंच त्यांच्या वाहनताफ्यावर दगडफेक केली. भाजपच्या कार्यकर्त्यांनी कारवर दगडफेक केल्याचा आरोप काँग्रेसनं केला होता. दगडफेक केल्यानंतर कार्यकर्त्यांनी मोदी-मोदी अशा घोषणाही दिल्याचा दावा करण्यात आला होता. भाजपच्या गुंडांनी राहुल गांधींच्या कारवर हल्ला केल्याचा आरोप काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी केला होता.
बनासकाठामध्ये राहुल गांधी म्हणाले, मी तुम्हा सर्वांमध्ये येऊ इच्छितो, काँग्रेस पक्ष हा तुमच्यासोबत आहे. मी पूरग्रस्तांच्या सोबत आहे. तत्पूर्वी काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींनी राजस्थानमधील जालोर जिल्ह्यातील पूरग्रस्त लोकांशी बातचीत केली होती.