ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ७ - भारत आणि पाकिस्तानमध्ये राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार स्तरावर झालेल्या चर्चेवर ज्येष्ठ नेते यशवंत सिन्हा यांनी टिका करुन भाजपला घरचा आहेर दिला आहे. सोमवारी काश्मीरमध्ये सीआरपीएफच्या ताफ्यावर हल्ला झाला त्या पार्श्वभूमीवर सिन्हा यांनी पाकिस्तानसोबत चर्चा करण्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केल आहे.
दहशतवाद आणि चर्चा एकत्र होऊ शकत नाही हे भाजपने आपले धोरण स्पष्ट केले असताना, असे काय घडले की, आपण पाकिस्तानबरोबर सगळया मुद्यांवर चर्चा करायला तयार झालो असा सवाल सिन्हा यांनी विचारला. बँकॉकमध्ये रविवारी भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल आणि पाकिस्तानचे एनएसए नासीर जांजुआ यांच्यामध्ये सुरक्षा, दहशतवाद आणि जम्मू-काश्मीरच्या विषयावर चर्चा झाली.
बँकॉकमध्ये झालेल्या या गुप्त बैठकीवर काँग्रेससह सर्वच विरोधी पक्षांनी जोरदार टिका केली आहे. संसदेला विश्वासात न घेता पाकिस्तान सोबत एनएसए स्तरावरची चर्चा करणे हा संसदेचा अपमान आहे असे काँग्रेस नेते आनंद शर्मा म्हणाले.