भोपाळ : माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या निधनाचे भाजपातर्फेराजकारण केले जात असल्याचा आरोप त्यांची भाची करुणा शुक्ला यांनी केला आहे. पुढील वर्षीच्या लोकसभा निवडणुकांच्या तयारीसाठी वाजपेयी यांच्या निधनाचा वापर करणे अयोग्य आहे, असेही करुणा शुक्ला यांनी म्हटले आहे.
भाचीनेच केला आरोप; निवडणुकीसाठी असे करणे अयोग्य
वाजपेयी जिवंत असताना भाजपाने त्यांचा खूप फायदा करून घेतला, पण मृत्यूनंतर असा राजकीय फायदा उठविणे चुकीचे असून, ते करण्यात भाजपाला शरम कशी वाटत नाही, असा सवाल त्यांनी विचारला आहे. त्यांच्यामुळे भाजपाला खूप फायदा झाला आणि आता मृत्यूनंतरही राजकीय फायद्यासाठी त्यांचा वापर केला जात आहे. मध्य प्रदेश, उत्तराखंड, राजस्थान व छत्तीसगड या चार राज्यांत या वर्षी विधानसभा निवडणुका होणार असल्याने, तिथे त्यांच्या निधनाचे राजकारण भाजपाने सुरूच केले आहे. केवळ निवडणुका जिंकण्यासाठी असे करण्यामुळे आपण दु:खी असल्याचे शुक्ला म्हणाल्या.
लालकृष्ण आडवाणी यांचा भाजपामध्ये होणारा अवमान, अवहेलना पाहून अतिशय दु:ख होते, असे सांगून त्या म्हणाल्या की, वाजपेयी आजारी असताना भाजपा नेत्यांना त्यांची फारशी आठवण झाली नाही, पण त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे कळताच, हे नेते घाईघाईने रुग्णालयात गेले आणि निधनानंतर तर त्यांच्या नावाने राजकीय प्रचाराचे जणू कार्यक्रमच पक्षाने सुरू केले आहेत.करुणा शुक्ला भाजपाच्या माजी खासदार आहेत. त्यांनी भाजपाचा २0१३ मध्ये राजीनामा दिला होता. नंतर त्या २0१४ साली काँग्रेसमध्ये दाखल झाल्या आहेत.वाजपेयी यांच्या अस्थींचे ग्वाल्हेरमध्ये विसर्जन करण्यात आल्यानंतर मुख्यमंत्र्यापासून भाजपाचे सारे नेते आपापल्या कारमधून निघून गेले. मात्र, वाजपेयी यांच्या नातेवाइकांना घरी जाण्यासाठी रिक्षाची वाट पाहावी लागली. अस्थीविसर्जनासाठी त्यांना कारमधून नेण्यात आले, पण विसर्जनानंतर एकही कार त्यांच्यासाठी थांबली नाही.
वाजपेयींचे नातेवाईक रिक्षाच्या प्रतीक्षेतअस्थीविसर्जनानंतर मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान लगेचच वाजपेयींच्या या नातेवाइकांच्या घरी गेले, पण ही मंडळी तिथे नव्हती. ती रस्त्यात रिक्षासाठी थांबली होती. त्याचा व्हिडीओच सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ग्वाल्हेरमध्ये वाजपेयी यांचे जुने घर असून, तिथे त्यांची भाची कांती मिश्रा, तसेच त्यांचे पती, मुलगी व अन्य काही नातेवाईक राहतात.