रांची : महाराष्ट्रानंतर आता झारखंड हे राज्यही भारतीय जनता पक्षाच्या हातातून जाण्याची चिन्हे दिसत आहेत. झारखंड विधानसभेसाठीचे पाचव्या टप्प्यातील मतदान शुक्रवारी संपल्यानंतर एक्झिट पोलचे जे निष्कर्ष जाहीर झाले, त्यातून भाजपला तिथे पुन्हा सत्ता मिळण्याची शक्यता नाही. मात्र, तिथे कदाचित कोणालाच बहुमत मिळणार नाही आणि विधानसभा त्रिशंकू असू शकेल, असा एक्झिट पोलचा अंदाज आहे. या अंदाजामुळे भाजपचे नेते अस्वस्थ दिसत आहेत.
झारखंडमधील विधानसभेच्या ९१ जागांसाठी पाच टप्प्यांत मतदान झाले. इंडिया टुडेच्या एक्झिट पोलनुसार या राज्यात हेमंत सोरेन यांच्या नेतृत्वाखालील झारखंड मुक्ती मोर्चा, काँग्रेस आणि राष्ट्रीय जनता दल यांना मिळून ३८ ते ५0 जागा मिळू शकतील. सध्या सत्तेत असलेल्या भाजप व मित्रपक्षांना मिळून २२ ते ३२ जागा मिळू शकतील, असा अंदाज या एक्झिट पोलने व्यक्त केला आहे. राज्यातील आॅल झारखंड स्टुडंटस् युनियन (एजेएसयू) ला ३ ते ५, झारखंड विकास मोर्चाला २ ते ४ आणि अन्य यांना ४ ते ५ जागा मिळू शकतील, असा या एक्झिट पोलचा अंदाज आहे. अर्थात यातील काही पक्षांच्या मदतीनेच भाजपने २0१४ साली सरकार स्थापन केले होते. भाजपला २0१४ सालीही स्पष्ट बहुमत मिळू शकले नव्हते. त्यामुळे यावेळीही भाजप या पक्षांना जवळ करण्याचा प्रयत्न करील. त्यापैकी एजेएसयू हा पक्ष सरकारमध्ये भाजपसह सहभागी होता; पण त्या पक्षाने निवडणूक मात्र स्वतंत्रपणे लढवली.
आयएएनएस-सी व्होटर यांच्या एक्झिट पोलमध्ये झारखंड मुक्ती मोर्चा, काँग्रेस व राष्ट्रीय जनता दल यांच्या आघाडीला मिळून ३१ ते ३९, तर भाजप व मित्रपक्षांना मिळून २८ ते ३६ जागा मिळतील, असा अंदाज व्यक्त झाला आहे. एजेएसयूला ७, तर विकास मोर्चाला १ ते ४ जागा मिळतील, असे या पोलमधून दिसते. त्यामुळे त्रिशंकू विधानसभा, काँग्रेस व मित्रपक्षांची सत्ता, की लहान पक्षांना आयत्या वेळी आपल्याकडे खेचून पुन्हा भाजप, अशी चर्चा सुरू झाली आहे. आदिवासीबहुल झारखंडमध्ये भाजपने रघुबर दास या बिगर आदिवासी नेत्याला मुख्यमंत्री केल्याने राज्यात नाराजी होती. त्यामुळे लोकांनी यंदा भाजपकडे पाठ वळवली, असे एक्झिट पोल सांगतात. (वृत्तसंस्था)आणखी एक राज्य हातातून जाणार?च्गेल्या वर्षी मध्यप्रदेश, राजस्थान व उत्तराखंड ही राज्ये भाजपकडून गेली. यावर्षी भाजपला महाराष्ट्राची सत्ता मिळवता आली नाही.च्आता झारखंडमधील सत्ता काँग्रेस व मित्रपक्षांना मिळाल्यास तो भाजपसाठी मोठाच धक्का असेल. राज्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी व पक्षाध्यक्ष अमित शहा यांनी जोरदार प्रचार केला होता.च्पंतप्रधान मोदी यांच्या नावानेच भाजपने ही निवडणूक लढवली होती.