ऑनलाइन लोकमत
बंगळुरु, दि. १५ - काळा पैसा बाहेर काढण्यासाठी ५०० आणि १ हजाराच्या नोटा रद्द केल्यानंतर बँक खाती आणि अन्य ठिकाणी सुरु असलेल्या व्यवहारांवर आयकर खाते बारीक लक्ष ठेऊन आहे. यातून मोठे जंगी विवाहसोहळेही सुटलेले नाहीत. कर्नाटकातील भाजपचे माजी मंत्री गाली जर्नादन रेड्डी यांच्या मुलीचा विवाहसोहळाही आयकर खात्याच्या रडारवर आहे.
रेड्डी यांच्या मुलीच्या लग्नात १०० कोटीपेक्षा जास्त खर्च होण्याची शक्यता असल्याने लग्नातील पैशांचा जो स्त्रोत आहे त्या व्यवहारावर इन्कम टॅक्स खात्याची नजर आहे. आंध्रप्रदेशातील उद्योगपतीशी जर्नादन रेड्डी यांच्या मुलीचा बुधवारी विवाह होणार आहे. बंगळुरुच्या पॅलेस ग्राऊंड मैदानावर या विवाहाचे रिसेप्शन पार पडणार आहे.
भ्रष्टाचार आणि बेकायद खाणकाम प्रकरणात गाली जर्नादन रेड्डीला २०१२ मध्ये अटक झाली. मागच्याच वर्षी त्यांना जामीन मिळाला. २००७ ते २०११ दरम्यान बेकायद मार्गाने त्यांनी १ हजार कोटीपेक्षा जास्तची संपत्ती जमवल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. गाली जर्नादन रेड्डीच्या मुलीच्या लग्नामध्ये बॉलिवूड, टॉलिवूडचे कलाकारही सहभागी होणार असल्याची चर्चा आहे.