भाजपाने सर्व ताकद लावली पणाला; देशभरातील नेते कर्नाटकात येणार, ४० स्टार प्रचारकांची नावे निश्चित
By ऑनलाइन लोकमत | Published: April 1, 2023 08:15 AM2023-04-01T08:15:03+5:302023-04-01T08:15:25+5:30
कर्नाटकात दर पाच वर्षांनी सत्ता बदलण्याची परंपरा चालत आलेली आहे.
- संजय शर्मा
नवी दिल्ली : कर्नाटकात सत्तावापसी करण्यासाठी कठोर संघर्ष करीत असलेल्या भाजपने पक्षाचे संपूर्ण संघटन राज्यात उतरवण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र, तेलंगणा, आंध्र प्रदेश, तामिळनाडू या शेजारी राज्यांतील भाजप नेत्यांना कर्नाटकमध्ये पाठविण्याचा निर्णय घेतला आहे.
कर्नाटकात दर पाच वर्षांनी सत्ता बदलण्याची परंपरा चालत आलेली आहे. हिमाचल प्रदेशात भाजप ही परंपरा बदलू शकला नाही. परंतु, कर्नाटकमध्ये ही परंपरा बदलण्यासाठी संपूर्ण ताकद पणाला लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. निवडणुकीत संपूर्ण ताकद पणाला लावण्यासाठी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी सर्व राष्ट्रीय सरचिटणीसांची बैठक बोलावली आहे. बैठकीचा अजेंडा कर्नाटकमध्ये सर्व नेत्यांना उतरविण्याचा आहे.
४० स्टार प्रचारकांची नावे निश्चित
कर्नाटकात ४० स्टार प्रचारकांची नावेही निश्चित करण्यात आली आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, शिवराजसिंह चौहान, प्रमोद सावंत, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह, स्मृती इराणी, निर्मला सीतारामन, माजी मुख्यमंत्री बी. एस. येदीयुरप्पा यांच्यासह अनेक दिग्गजांची नावे या यादीत समाविष्ट करण्यात आली आहेत. सर्वांना कर्नाटकसाठी दोन आठवड्यांचा वेळ देण्यास सांगण्यात आले आहे. ५ व ६ एप्रिल रोजी भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक बोलावण्यात येणार आहे. या बैठकीत कर्नाटकच्या भाजप उमेदवारांच्या नावांवर निर्णय घेण्यात येणार आहे.