महाराष्ट्रातील भाजप नेते करणार मध्य प्रदेशातील उमेदवारांची निवड; फडणवीसांवर मोठी जबाबदारी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2023 09:27 AM2023-08-19T09:27:22+5:302023-08-19T09:28:27+5:30

मध्य प्रदेशातील ४६ विधानसभा जागांसाठी भाजप उमेदवार ठरविण्याची जबाबदारी महाराष्ट्रातील भाजपचे ५० तडफदार नेते व आमदार यांच्यावर सोपविण्यात आली आहे.

bjp leaders from maharashtra will select candidates from madhya pradesh big responsibility on devendra fadnavis | महाराष्ट्रातील भाजप नेते करणार मध्य प्रदेशातील उमेदवारांची निवड; फडणवीसांवर मोठी जबाबदारी

महाराष्ट्रातील भाजप नेते करणार मध्य प्रदेशातील उमेदवारांची निवड; फडणवीसांवर मोठी जबाबदारी

googlenewsNext

संजय शर्मा, लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : महाराष्ट्राच्या सीमेला लागून असलेल्या मध्य प्रदेशातील ४६ विधानसभा जागांसाठी भाजप उमेदवार ठरविण्याची जबाबदारी महाराष्ट्रातील भाजपचे ५० तडफदार नेते व आमदार यांच्यावर सोपविण्यात आली आहे. हे नेते एका आठवड्याच्या आत उमेदवारांची यादी भाजप पक्षश्रेष्ठींना सादर करणार आहेत.

मध्य प्रदेशमध्ये सुमारे २० वर्षे भाजप सत्तेवर आहे. या सरकारला प्रस्थापितविरोधी जनमताचा फटका बसू नये म्हणून भाजपने उत्तम उमेदवारांच्या निवडीवर आपले सारे लक्ष केंद्रित केले आहे. महाराष्ट्राच्या सीमेलगत मध्य प्रदेशमधील ४६ विधानसभा जागांवर उमेदवार निवडण्यासाठी महाराष्ट्रातून ५० भाजप आमदार, नेत्यांना येत्या दोन दिवसांत मध्य प्रदेशात पाठवावे, असा आदेश भाजप पक्षश्रेष्ठींनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिला. भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या बुधवारी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

भाजप आमदार, नेते लवकरच भोपाळमध्ये पोहोचून उमेदवार निवडीच्या प्रक्रियेत सहभागी होतील. ते नेमून दिलेल्या विधानसभा मतदारसंघात आठवडाभर राहतील. त्यानंतर उमेदवाराचे नाव निश्चित करून ते २५ ऑगस्टपर्यंत भाजप पक्षश्रेष्ठींना कळविण्यात येईल. खांडवा, बुऱ्हाणपूर, खरगोन, बैतूल, आमला, छिंदवाडा, बालाघाट जिल्ह्यांतील या विधानसभा जागांवर उमेदवार निवडण्याबरोबरच त्याला जिंकून आणण्याची जबाबदारीही महाराष्ट्रातील तडफदार भाजप नेते, आमदारांवर सोपविली जाणार आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे महत्त्वाच्या जबाबदाऱ्या

महाराष्ट्रासोबतच उत्तर प्रदेशमधील १०० भाजप आमदारांवर मध्य प्रदेशमधील १०० जागांची तर गुजरातमधील ५० भाजप आमदारांवर मध्य प्रदेशातील ५० जागांची, बिहारमधील भाजप आमदारांवर ३० जागांची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मध्य प्रदेश, छत्तीसगड या विधानसभा निवडणुकांच्या प्रचार मोहिमेची जबाबदारी दिली जाणार आहे.

 

Web Title: bjp leaders from maharashtra will select candidates from madhya pradesh big responsibility on devendra fadnavis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.