चंडीगड - हत्या आणि लैंगिक शोषणाच्या गुन्ह्यांमध्ये शिक्षा झालेला गुरमीत रामरहीम सध्या पॅरोलवर तुरुंगाबाहेर आहे. दरम्यान, तुरुंगाबाहेर येताच त्याने सत्संग सुरू केले आहेत. त्याने केलेल्या ऑनलाईन सत्संगामध्ये करनाल पंचायत निवडणुकीत उभे असलेले अनेक उमेदवार आणि भाजपाचे नेते सहभागी झाले होते. त्यामुळे आता नव्या वादाला तोंड फुटले आहे. मात्र रामरहीमकडून घेतलेल्या आशीर्वादावरून वाद वाढल्यानंतर या नेत्यांनी सारवासारव केली. तसेच त्याच्याशी कुठलाही संबंध नसल्याचं स्पष्टीकरण दिलं आहे.
राम रहीमच्या ऑनलाईन सत्संगामध्ये करनाल जिल्ह्यातील लोक सहभागी झाले होते. यादरम्यान, जिल्ह्यातील पंचायत निवडणूक लढवत असलेल्या उमेदवारांनीही राम रहीमचा आशीर्वाद घेतला. एवढंच नाही तर सत्संगामध्ये भाजपाचेही अनेक मोठे नेते सहभागी झाले. यामध्ये महानगरपालिकेच्या महापौर रेणू बाला गुप्ता, जिल्हाध्यक्ष योगेंद्र राणा, उपमहापौर नवीन कुमार आणि वरिष्ठ उमहापौर राजेश हेही गुरमीत राम रहीमच्या सत्संगात उपस्थित राहिले. त्याबरोबरच त्यांनी राम रहीम याला करनालमध्ये येण्याचं निमंत्रणही दिलं.
दरम्यान, हत्या, लैंगिक शोषण यांसारख्या गंभीर गुन्ह्यात शिक्षा झालेल्या राम रहीमसमोर भाजपा नेत्यांनी घातलेले दंडवत चर्चेचा विषय ठरले असून, त्यातून वादाला तोंड फुटले आहे. त्याबरोबरच निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून राम रहीमला पॅरोल देण्यात आल्याचा आरोप केला जात आहे. मात्र या संपूर्ण घटनांशी आपला संबंध नसल्याचे भाजपा नेत्यांनी म्हटले आहे.
आता वरिष्ठ उपमहापौरांनी सांगितले की, बाबाजींचा सत्संग होता आणि आम्हाला साथ संगतीसाठा बोलावण्यात आले होते. उत्तर प्रदेशातून हा ऑनलाईन सत्संग केला गेला. तसेच बोलावण्यावरून पोहोचून संगतीसोबत गाठीभेटी झाल्या. माझ्या वॉर्डमधील बरेच लोक बाबासोबत जोडले गेलेले आहेत. आम्ही सामाजिक नात्याने कार्यक्रमात पोहोचले होते. याचा भाजपा आणि निवडणुकीशी काहीही संबंध नाही आहे.