Lok Sabha Election 2024: लोकसभा निवडणुकीच्या अखेरच्या सातव्या टप्प्यातील मतदान ०१ जून रोजी होणार आहे. तर, ०४ जून रोजी मतमोजणी आहे. मात्र, शेवटच्या टप्प्यासाठीच्या प्रचाराला चांगलाच वेग आल्याचे पाहायला मिळत आहे. इंडिया आघाडी आणि एनडीए नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी अग्निवीर योजनेवरून केंद्र सरकारवर सातत्याने टीका करताना दिसत आहेत. भाजपाकडूनहीराहुल गांधी यांच्या टीकेला प्रत्युत्तर देण्यात आले आहे.
काँग्रेसने देशात गोंधळ घालणे थांबवावे. बोफोर्स, ऑगस्टा वेस्टलँड असे अनेक घोटाळे काँग्रेसने केले आहेत. काँग्रेसने लष्कराला काहीही दिले नाही. लष्कराला वन रँक, वन पेन्शन दिली गेली नाही. मोदी सरकारने लष्कराला बुलेटप्रूफ जॅकेट, शस्त्रे आणि दारूगोळा दिला. अग्निवीर योजनेत १०० टक्के नोकरीची हमी आहे. ७५ टक्के अग्निवीर सैनिक चार वर्षे सैन्यात राहतील आणि त्यानंतर त्यांना पोलीस विभाग आणि खासगी क्षेत्रात संधी मिळू शकते, असे केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी सांगत काँग्रेसवर टीकास्त्र सोडले.
राहुल गांधी ना सैन्यात भरती होऊ शकत, ना स्वतः काही कमावू शकत
आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा सरमा यांनीही राहुल गांधींवर टीका केली. अग्निवीर योजना तरुणांना आवडते. त्यामुळेच एवढ्या मोठ्या संख्येनं तरुण मुलाखती देण्यासाठी येत आहेत. अग्निवीर योजनेंतर्गत लोकांना प्रथम सैन्यात नोकरी मिळेल आणि नंतर राज्य पोलिसांत नोकरी मिळू शकेल. राहुल गांधी ना सैन्यात भरती होऊ शकतात, ना अग्निवीर होऊ शकतात. ते स्वत: कमवून काही खाऊ शकत नाही. ते त्यांच्या आईवर ओझे आहेत. सैन्याबद्दल काहीही चुकीचे बोलू नका, असा इशारा हेमंत बिस्वा सरमा यांनी दिला.
दरम्यान, राहुल गांधींना सल्ला देतो की, आधी सैन्यात सेवा करा आणि मग लष्कराबद्दल बोला. आधी सैन्य समजून घ्या मग बोला. त्याच्या टिप्पणीचा काही फायदा नाही, असा पलटवार जनरल व्ही.के.सिंह यांनी केला.