डेहराडून : लैंगिक शोषणाविरुद्धच्या ‘मी टू’ मोहिमेची धग आता भारतीय जनता पार्टीलाही लागली आहे. एका महिलेने केलेल्या आरोपांनंतर भाजपाचे उत्तराखंडातील सरचिटणीस संजय कुमार यांच्याकडून पदाचा राजीनामा घेण्यात आला आहे. संजय कुमार हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अनेक वर्षे प्रचारक होते आणि गेली सात वर्षे ते सरचिटणीस आहेत.त्यांच्या राजीनाम्याची मागणी काँग्रेस सातत्याने करीत होता. आता केवळ राजीनाम्याने भागणार नाही, संजय कुमार यांची चौकशी करून, त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी काँग्रेसने केली आहे.संजय कुमार यांच्यावर उत्तराखंडमधील महिलेने लैंगिक शोषणाचे आरोप केले होते. ते गेली पाच वर्षे सातत्याने आपला छळ करीत आहेत, त्यांच्याविरोधात आपण अनेकदा तक्रार केली. पण पक्षाचे नेते त्यांच्यावर काहीच कारवाई करायला तयार नाहीत, असे त्या महिलेने एका हिंदी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे. महिलेचे आरोप प्रसिद्ध होताच, भाजपा नेतृत्वाची पंचाईत झाली. संजय कुमार यांच्याविरोधात काँग्रेसने आंदोलने केली. (वृत्तसंस्था)आंदोलन सुरूच राहणारत्यांना पदावरून हटवल्याचे वृत्त सर्वत्र पसरल्यानंतरही, त्यांनी वैयक्तिक कारणास्तव स्वत:हून राजीनामा दिला असून, तो स्वीकारून, त्यांना पदमुक्त करण्यात आले आहे. मात्र, त्यांना राजीनामा देण्यास पक्षाने सांगितले नव्हते, असे भाजपाचे उत्तराखंडमधील प्रदेशाध्यक्ष अजय भट्ट व अन्य भाजपा नेते सांगत आहेत.
लैंगिक शोषणाच्या आरोपांनंतर भाजपाच्या नेत्याचा राजीनामा, सरचिटणीस संजय कुमार अखेर पदमुक्त
By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2018 5:51 AM