तुरा (मेघालय) : पुढील वर्षी मेघालयातील विधानसभा निवडणुकीत नागरिकांनी भाजपच्या बाजूने कौल दिल्यास राज्यात स्वस्त बीफ दिले जाईल, असे आश्वासन पक्षाचे जिल्हाध्यक्ष बर्नार्ड एन. मारक यांनी दिले आहे. तथापि, राज्यात यावर बंदी घालण्याचा कोणताही विचार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. जनावरांची कत्तल करण्यास बंदी आणल्यानंतर केंद्रातील सरकारवर टीका होत असतानाच भाजप नेते बर्नार्ड मारक यांनी हे विधान केले आहे, हे विशेष. ते म्हणाले की, मेघालयात भाजपचे बहुतांश नेते बीफ खातात. मेघालयासारख्या राज्यात विशेषत: गारो हिल्समध्ये बीफवर प्रतिबंध आणण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. मेघालयाच्या ऐतिहासिक पार्श्वभूमीबाबत भाजप नेत्यांना माहिती आहे. मारक म्हणाले की, गारो हिल्समध्ये बीफ महाग असते. त्यामुळे सर्व लोक ते खाऊ शकत नाहीत. हे दर सामान्य ठेवण्यात राज्य सरकारला अपयश आले आहे. चिकित्सेशिवाय जनावरांची कत्तल केली जाते. त्यामुळे लोकांच्या आरोग्यावर याचा परिणाम होतो. कत्तलीसाठी गाई- गुरे विक्री करण्यास बंदी घालण्याची अधिसूचना केंद्राने जारी केल्यानंतर त्याचे पडसाद केरळात उमटले. राज्याच्या अनेक भागांत विद्यार्थी आणि कार्यकर्त्यांनी बीफ पार्टी आयोजित केली होती. माकप आणि एसएफआयचे कार्यकर्ते यांचा यात पुढाकार होता.राहुल गांधींकडून बैलाच्या हत्येचा निषेधकेरळमध्ये सार्वजनिक ठिकाणी बैलाची हत्या केल्याच्या घटनेचा काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी सोमवारी निषेध केला आहे. केंद्र सरकारने हत्येसाठी गायींच्या, जनावरांच्या बाजारातील विक्रीवर बंदी घातल्याच्या निषेधार्थ बैलाची सार्वजनिक ठिकाणी हत्या करण्यात आली. ‘बैलाची हत्या ही घटना निर्बुद्ध आणि भयंकर आहे’, असे गांधी टिष्ट्वटरवर म्हणाले. हा सगळाच प्रकार मला आणि काँग्रेस पक्षाला मान्य न होणारा आहे, असेही ते म्हणाले. चेन्नईत सरकारचा निषेधचेन्नई : गायींच्या विक्रीवर घालण्यात आलेल्या बंदीच्या निषेधार्थ तामिळनाडूच्या अनेक भागांत सोमवारी निदर्शने करण्यात आली. या बंदीच्या विरोधात द्रमुक ३१ मे रोजी आंदोलनही करणार आहे. बीफ खाण्याचा कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल पोलिसांनी तमिळवादी; परंतु प्रसिद्ध नसलेल्या संघटनेच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. आयआयटी मद्रासमध्ये विद्यार्थ्यांच्या एका गटाने रविवारी रात्री संस्थेच्या परिसरात बीफ खाण्याचा महोत्सव आयोजित केला होता.ममता म्हणाल्या, बंदी मान्य नाही...कोलकाता : बाजारातील गायींच्या विक्रीवर केंद्र सरकारने घातलेली बंदी आम्हाला मान्य नाही, असे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सोमवारी म्हटले. सरकारच्या निर्णयाला आम्ही न्यायालयात आव्हान देऊ. मोदी सरकारचा निर्णय हा पूर्णपणे लोकशाहीविरोधी व घटनाविरोधी असल्याचे बॅनर्जी कोलकात्यात वार्ताहरांशी बोलताना म्हणाल्या. तीन कार्यकर्ते निलंबितकेरळमध्ये उघड्यावर बैलाची कत्तल केल्याप्रकरणी कन्नूर जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष रिजिल मक्कुट्टी व जोशी कंदाथील आणि शरफुद्दीन यांना पक्षाने निलंबित केले.या कार्यकर्त्यांच्या कृतीमुळे टीका होत असतानाच पक्षाने त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे.
भाजप नेते म्हणाले, स्वस्त बीफ देऊ
By admin | Published: May 30, 2017 1:36 AM