जयपूर : राजस्थानातील बारन येथे झालेल्या कथित दोन बलात्कारित मुलींची भेट घ्यायला काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियांका गांधी का गेले नाहीत, असे विचारण्याऐवजी भाजप नेत्यांनी स्वत: राजस्थानात येऊन संबंधित जिल्ह्यात जावे व वास्तव समजून घ्यावे, असे प्रतिपादन राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी केले आहे.
उत्तर प्रदेशातील हाथरसमध्ये बलात्कार करून हत्या करण्यात आलेल्या दलित मुलीच्या परिवाराला भेटण्यासाठी जात असताना राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांना काल उत्तर प्रदेश पोलिसांनी अटक करून माघारी पाठवले होते. या अनुषंगाने गेहलोत यांनी सांगितले की, लोकशाहीमध्ये विरोधी पक्षाच्या नेत्यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. राजस्थानातील बलात्काराच्या आरोपासंदर्भात गेहलोत यांनी सांगितले की, अमित शाह आणि धर्मेंद्र प्रधान यांच्यासारखे भाजप नेते बारनला अथवा राज्यात अन्यत्र कोठेही भेट देऊन वस्तुस्थिती जाणून का घेत नाहीत? आम्ही त्यांना भेटीची परवानगी तर देऊच; पण त्याबरोबरच त्यांना पोलीस संरक्षणही देऊ. राजस्थानातील बारन जिल्ह्यातील दोन अल्पवयीन मुली १९ सप्टेंबर रोजी बेपत्ता झाल्या होत्या. नंतर २२ सप्टेंबर रोजी त्या कोटा येथे सापडल्या. त्यांचा जबाब नोंदवून पोलिसांनी त्यांना कुटुंबाच्या स्वाधीन केले. तपासणीत बलात्काराची पुष्टी होऊ शकली नाही.‘निर्भया’च्या वकील लढणार हाथरसचा खटलाच्निर्भया प्रकरणातील दोषींना फाशीची शिक्षा देऊन चर्चेत आलेल्या उत्तर प्रदेशातील इटावाच्या वकील सीमा समृद्धी कुशवाहा आता हाथरस प्रकरणातील पीडितेला न्याय देण्यासाठी हा खटला मोफत लढणार आहेत.च्हाथरसमधील पीडितेच्या कुटुंबाला भेटण्यासाठी सीमा या त्या गावी जात असताना प्रशासनाने त्यांना अडविले. यावेळी हाथरसच्या अपर जिल्हाधिकाऱ्यांशी त्यांचा झालेला वाद व्हायरल झाला आहे. सीमा यांचे पती राकेश हे बिहारमधील मुंगेर गावचे आहेत.