बंगळुरू : गुरुवारी मध्यरात्रीनंतर भाजपाध्यक्ष अमित शहा यांचा बी. एस. येडियुरप्पा यांना फोन आला आणि येडियुरप्पांचे मुख्यमंत्रीपद निश्चित झाले, असे स्पष्ट झाले आहे. येडियुरप्पा यांच्या मुख्यमंत्रीपदाला हिरवा कंदिल दाखवताना, तूर्त तुम्हीच फक्त शपथ घ्या, मंत्रिमंडळाचा विस्तार बहुमत सिद्ध झाल्यानंतर करा, असे त्यांना अमित शहा यांनी सांगितले, तसेच बहुमत सिद्ध करण्याची तुम्हाला खात्री आहे का, असा प्रश्नही शहा यांनी येडियुरप्पा यांना केल्याचे समजते.येडियुरप्पा यांच्याकडे बहुमत नाही. त्यामुळेच गेल्या वर्षी तीन दिवसांत त्यांना जसा राजीनामा द्यावा लागला, तशी वेळ पुन्हा येऊ नये, यासाठी केंद्रीय नेत्यांना लगेच शपथविधी नको होता; पण आपण बहुमत सिद्ध करू, अशी खात्री येडियुरप्पा यांनी दिली. रात्री त्यांना फोन करण्यापूर्वी शहा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मतही जाणून घेतले आणि हिरवा कंदिल दाखवला.येडियुरप्पा यांना खरोखरच बहुमत सिद्ध करता येईल का, याविषयी नेत्यांना शंका असल्याने येडियुरप्पा यांनी एकट्याने शपथ घेण्याचा तोडगा काढला.येडियुरप्पा यांना राज्यपालांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ दिली. त्याचे निमंत्रण विरोधी पक्षाच्या नेत्यांना तर सोडाच, पण पक्षाच्या अनेक आमदार व नेत्यांनाही नव्हते. दिल्लीहून एकही बडा नेता त्यांच्या शपथविधीसाठी आला नव्हता. (वृत्तसंस्था)- कुमारस्वामी सरकार पडल्यानंतर येडियुरप्पा लगेचच सरकार स्थापनेचा दावा करतील, अशी अपेक्षा होती; पण भाजपच्या केंद्रीय नेत्यांनी घाई करू नका आणि दिल्लीत या, असा निरोप दिला.- येडियुरप्पा दिल्लीत गेले, नेत्यांना भेटून बंगळुरूला परतले; पण अमित शहा, कार्याध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी स्पष्टपणे काही सांगितले नाही. त्यामुळे भाजपचे आमदार अस्वस्थ होते.
येडियुरप्पा यांना हिरवा कंदिल देताना भाजप नेत्यांनी बाळगली कमालीची सावधगिरी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2019 5:25 AM