नवी दिल्ली : मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान आणि राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांची आज दिल्लीत भाजपा नेतृत्वासोबत चर्चा होणार आहे. सुत्रांच्या माहितीनुसार, शिवराज सिंह चौहान आणि वसुंधरा राजे आज दिल्लीत असणार आहे. दिल्लीत भाजपाचे उच्च नेतृत्व शिवराज सिंह चौहान आणि वसुंधरा राजे यांच्यासोबत बैठक घेणार आहेत.
भाजपा नेतृत्व अशा वेळी या दोन नेत्यांची भेट घेणार आहे, जेव्हा नुकत्याच झालेल्या विधानसभा निकालानंतर भाजपा या दोन चेहऱ्यांना मध्य प्रदेश आणि राजस्थानचे मुख्यमंत्री बनवेल, अशी चर्चा वर्तविली जात होती. मात्र भाजपाने मोहन यादव यांना मध्य प्रदेशचे आणि भजनलाल शर्मा यांना राजस्थानचे मुख्यमंत्री करून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला होता.
काही दिवसांपूर्वी शिवराज सिंह चौहान यांनी पक्षाकडून स्वत:साठी काहीही मागण्यापेक्षा 'मरणे' पसंत करेन, असे म्हटले. तसेच, चार वेळा मुख्यमंत्री राहिलेले शिवराज सिंह चौहान म्हणाले होते की, भाजपा जे काही काम देईल ते पूर्ण करेल. दरम्यान, विधानसभा निवडणुकीत पक्षाच्या नेत्रदीपक विजयानंतर भाजपने शिवराज सिंह चौहान यांच्या जागी मोहन यादव यांना मुख्यमंत्री बनवले आहे.
मध्य प्रदेशप्रमाणेच राजस्थानमध्येही भाजपाने वसुंधरा राजे यांना मुख्यमंत्रीपद दिले नाही. त्यांच्याऐवजी जयपूरच्या सांगानेर मतदारसंघातून पहिल्यांदाच आमदार निवडून आलेले भजनलाल शर्मा यांना भाजपने राजस्थानचे नवे मुख्यमंत्री केले आहे. त्यामुळे हा सर्वांना एक आश्चर्याचा धक्का होता. भाजपा विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत राज्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून भजनलाल शर्मा यांची निवड करण्यात आली. या बैठकीत माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांनी नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवला होता, तो विधिमंडळ पक्षाने स्वीकारला. भजनलाल हे भाजपचे प्रदेश सरचिटणीस आहेत.