भाजप केवळ २३६ जागांवर आघाडीवर, काँग्रेस ९८; मग सत्ता कोणाच्या जिवावर...
By ऑनलाइन लोकमत | Published: June 4, 2024 01:16 PM2024-06-04T13:16:18+5:302024-06-04T13:17:26+5:30
एनडीएमधील भाजपनंतर दोन मोठे पक्ष ठरणाऱ्या नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडूंच्यावरच सारी भिस्त राहणार आहे.
लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली असून आतापर्यंत बहुतांश मतदारसंघांमध्ये निम्म्या फेऱ्यांची मतमोजणी पूर्ण झाली आहे. अशातच आता कोण जिंकणार, कोणा हरणार, पुढील सत्तास्थापनेची गणिते काय यावर चर्चा होऊ लागली आहे. एनडीएला २८८ जागांवर लीड मिळत आहे तर इंडी आघाडीला २३७ जागांवर आघाडी मिळताना दिसत आहे. परंतु, एनडीएमधील भाजपनंतर दोन मोठे पक्ष ठरणाऱ्या नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडूंच्यावरच सारी भिस्त राहणार आहे.
एनडीएला बहुमताचा आकडा घासून मिळताना दिसत असला तरी भाजपा सध्या २३६ जागांवरच आघाडीवर आहे. म्हणजे उर्वरित आकडा हा मित्रपक्षांचा आहे. तर इंडी आघाडीला २३७ जागांवर लीड दिसत असले तरी काँग्रेस ९८ जागांवरच आघाडीवर आहे. यामुळे सत्ता स्थापनेला जागा कमी पडल्या तर मोठी फोडाफोडी होण्याचीही शक्यता नाकारता येत नाहीय.
नितीशकुमार, चंद्राबाबू नायडूंचा कधी या गोटात तर कधी त्या गोटात जाण्याचा इतिहास आहे. यातच सोनिया गांधी स्वत: या दोघांसोबत फोनवरून चर्चा करणार आहेत. आंध्र प्रदेशात चंद्राबाबुंची स्वबळावर सत्ता येत आहे. यामुळे नायडू आणि कुमार निकालानंतर बाजू पलटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दिल्लीत याच्या हालचाली सुरु झाल्या असल्या तरी भाजपाही काही स्वस्थ बसणार नाही. हातातली सत्ता घालविण्यास भाजपा सहजासहजी तयार होणार नाही.
भाजपाला राजस्थान, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र या राज्यांमध्ये चांगलाच फटका बसला आहे. यामुळे गेल्यावेळी एकट्याने बहुमताचा आकडा पार करणाऱ्या भाजपला सत्ता स्थापन करण्यासाठी आता मित्रपक्षांवर अवलंबून रहावे लागणार आहे. २०१९ मध्ये शिवसेना, अकाली दलासारखे मोठे मित्रपक्ष भाजपाची साथ सोडून निघून गेले होते. तरीही बहुमत असल्याने त्याचा परिणाम भाजपावर झाला नव्हता. परंतु आता बहुमताचा आकडा स्वत:च्या जिवावर गाठणे कठीण असून सत्ताकेंद्रही आता बदलण्याची शक्यता आहे.