ठळक मुद्देकर्नाटकमधील येडियुरप्पा यांच्या नेतृत्वाखालील भाजपा सरकारचे भवितव्य पणालासुरुवातीच्या कलांमध्ये भाजपाची मुसंडी कर्नाटकमधील सत्ता टिकवण्यासाठी भाजपाला या पोटनिवडणुकीत किमान 6 जागा जिंकणे आवश्यक
बंगळुरू - कर्नाटक विधानसभेच्या 15 जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. सुरुवातीच्या कलांमध्ये भाजपाने मुसंडी मारली असून, आतापर्यंतच्या कलांमध्ये भाजपा 9 तर काँग्रेस आणि जेडीएसने प्रत्येकी दोन जागांवर आघाडी मिळवली आहे. तर एका जागेवर अपक्ष उमेदवार आघाडीवर आहे कर्नाटकमधील सत्ता टिकवण्यासाठी भाजपाला या पोटनिवडणुकीत किमान 6 जागा जिंकणे आवश्यक आहे.
कर्नाटक विधानसभेच्या 15 जागांसाठी 5 डिसेंबर रोजी मतदान झाले होते. त्यावेळी 66.25 टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. दरम्यान, या पोटनिवडणुकीची मतमोजणी सध्या सुरू असून, सुरुवातीच्या कलांमध्ये येल्लापूर, चिकबल्लारपूर, विजयनगरा आणि महालक्ष्मी या मतदारसंघात भाजपाने आघाडी घेतली आहे. तर शिवाजीनगर आणि हुनासुरू या मतदारसंघात काँग्रेस आघाडीवर आहे. होसकोटे मतदारसंघातून अपक्ष उमेदवार एस.के. बचेगौडा आघाडीवर आहेत.
2018 मध्ये कर्नाटक विधानसभान निवडणुकीचा त्रिशंकू निकाल लागल्यापासून राज्यात सत्तासंघर्ष सुरू आहे. त्यावेळी सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी काँग्रेसने जेडीएसला पाठिंबा दिला होता. मात्र काँग्रेस आणि जेडीएस सरकारमधील 17 आमदारांनी बंडखोरी केल्याने जुलै महिन्यात एच .डी . कुमारस्वामी यांचे सरकार कोसळले होते. त्यानंतर राज्यात येडियुरप्पा यांच्या नेतृत्वात भाजपाने पुन्हा एकदा सत्ता मिळवली. मात्र, ज्या आमदारांनी राजीनामे देत एच .डी . कुमारस्वामी सरकारचा पाठिंबा काढून घेतला. या आमदारांना तत्कालीन विधानसभा अध्यक्षांनी अपात्र ठरविले होते. आमदार अपात्र ठरल्याने रिक्त झालेल्या 15 मतदारसंघांमध्ये पोटनिवडणूक घेण्यात आली. दरम्यान, भाजपाचे 105 आमदार असून सत्ता कायम ठेवण्यासाठी त्यांना आणखी 6 आमदारांची गरज आहे.