पाटणा/नवी दिल्ली: बिहारमध्ये भारतीय जनता पक्षाला मोठा भाऊ करण्यात मोलाची भूमिका बजावणाऱ्या लोक जनशक्ती पक्षाचे नेते चिराग पासवान पंतप्रधान नरेंद्र मोदींवर नाराज आहेत. चिराग पासवान यांना लोकसभेतील पक्षाच्या गटनेते पदावरून दूर करत त्यांचे काका पशुपती पारस यांनी जोरदार धक्का दिला. त्यामुळे पक्षातील कलह समोर आला. यानंतर पक्षांतर्गत आव्हानांचा सामना करणाऱ्या चिराग यांनी त्यांची व्यथा मांडली आहे. भाजप आणि पंतप्रधान मोदींबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली.
गेल्या वर्षी बिहारमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत पासवान यांनी भाजपला मोठी मदत केली होती. एनडीएतून बाहेर पडणाऱ्या पासवान यांनी भाजपला मदत करत असताना भाजपचाच मित्रपक्ष असलेल्या संयुक्त जनता दलाचं खूप मोठं नुकसान केलं. भाजपविरोधात उमेदवार न देणाऱ्या लोक जनशक्ती पक्षानं संयुक्त जनता दलाविरोधात मात्र उमेदवार दिले. त्यामुळे २०१५ मध्ये ७० हून अधिक जागा जिंकणारा जेडीयू ४३ वर आला. तर भाजपला बंपर फायदा झाला.
विधानसभा निवडणूक प्रचारावेळी चिराग पासवान यांनी स्वत:ला 'मोदींचा हनुमान' म्हटलं होतं. मात्र आता पासवान यांनी स्पष्ट शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे. 'भाजपनं माझी साथ सोडली आहे असं मला वाटतं. भाजपमधल्या कोणीही माझ्याशी संपर्क साधलेला नाही. जेव्हा कोणीही भाजपच्या वरिष्ठ नेतृत्त्वाला पाठिंबा देत नव्हतं, कोणीही नरेंद्र मोदींचं समर्थन करत नव्हतं, त्यावेळी मी आणि माझे वडील रामविलास पासवान त्यांच्यासोबत उभे होतो. जेव्हा नितीश कुमार यांनी भाजपची साथ सोडली, तेव्हादेखील माझे वडील ठामपणे भाजपसोबत होतो. राम मंदिर, कलम ३७०, सीएए, तिहेरी तलाक या सगळ्या मुद्द्यांवर आम्ही भाजप आणि मोदींच्यासोबत होतो,' याची आठवण त्यांनी करून दिली.