- हरीश गुप्तानवी दिल्ली : पंजाब विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्रीपदासाठीचा उमेदवार जाहीर करायचा की १० मार्च रोजी निकाल जाहीर होतील तोपर्यंत वाट बघायची, याचा निर्णय भाजपचे श्रेष्ठी घेणार आहेत. राज्यात भाजप माजी मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांच्या पक्षाशी व सुखदेव सिंग धिंडसा यांच्याशी युती करून ६५-७० जागा लढवण्याची शक्यता आहे. भाजप आपला मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहीर करणार का किंवा युतीचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा अमरिंदरसिंग असतील, हे अजून स्पष्ट नाही.
पंजाबमध्ये भाजपने गेल्या ४० वर्षांत २३ पेक्षा जास्त जागा लढवलेल्या नाहीत आणि लढवल्या त्याही अकाली दलाचा दुय्यम सोबती या भूमिकेत. २०१७ मध्ये विधानसभा निवडणुकीत भाजपला फक्त ३ जागा जिंकता आल्या. तीन कृषी कायद्यांवरून अकाली दल केंद्र सरकारमधून बाहेर पडल्यानंतर भाजप राज्यात स्वबळावर पाय रोवण्याच्या प्रयत्नांत आहे.
भाजप अमरिंदरसिंग यांच्या पक्षासाठी आणि धिंडसा यांच्या गटाला ५० जागा सोडण्याची शक्यता आहे. काही दिवसांपूर्वी झालेल्या जनमत चाचण्यांत आम आदमी पक्ष (आप) प्रमुख दावेदार म्हणून समोर आल्यामुळे भाजपची चिंता वाढली आहे. ‘आप’ला रोखण्यासाठी भाजप काही मोजक्या मतदारसंघांत अकाली दलाशी संपर्क साधू शकतो.
भांडणामुळे पेचमुख्यमंत्री चरणजित सिंग चन्नी आणि प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धू यांच्यात भांडण असल्यामुळे चेहरा जाहीर करण्याचा पेच काँग्रेससमोरही आहे.
स्वबळावर लढायचे होते; पण...या निवडणुकीत स्वतंत्रपणे लढून आपल्याच शक्तीची चाचणी भाजपला करायची होती. परंतु, कोणालाच बहुमत मिळाले नाही तर काय होईल याची कोणालाच खात्री नाही. १८ जानेवारी रोजी ‘आप’ आपला मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर करण्याची शक्यता आहे व बहुतेक ते लोकसभा सदस्य भगवंत सिंग मान असतील.