BJP Lok Sabha Election: पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्ष तयारीला लागले आहेत. सत्ताधारी भारतीय जनता पक्षाने (BJP) लोकसभा निवडणुकीच्या प्रचारालाही सुरुवात केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मध्य प्रदेशातून भाजपच्या 'मेरा बूथ, सबसे मजबूत' अभियानाची सुरुवात केली होती. 2024 ची निवडणूक जिंकण्यासाठी पक्षाने आता मायक्रो मॅनेजमेंटच्या रणनीतीवर काम सुरू केले आहे.
तीन विभागात विभागणी
पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा आणि या वर्षाच्या अखेरीस होणाऱ्या विधानसभा निवडणुकांसाठी भाजपने मायक्रो मॅनेजमेंटसाठी मेगा प्लॅन तयार केला आहे. पक्षाचे कामकाज सुलभ करण्यासाठी भाजपने देशभरातील राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांची पूर्व, उत्तर आणि दक्षिण, अशा तीन विभागांमध्ये विभागणी केली आहे. भाजप अध्यक्ष प्रत्येक क्षेत्रातील प्रमुख नेते आणि संघटना मंत्र्यांची बैठक घेणार आहेत.
बुधवारी मोदींची मॅरेथॉन बैठक
भाजपच्या या मेगा प्लॅनची ब्लू प्रिंट गृहमंत्री अमित शहा (Amit Shah), भाजप अध्यक्ष जेपी नड्डा (JP Nadda) आणि संघटन मंत्री बीएल संतोष (BL Santosh) यांच्या बैठकीच्या तीन फेऱ्यांमध्ये तयार करण्यात आली आहे. बुधवारी रात्री पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांचीही मॅरेथॉन बैठक झाली. सुमारे चार तास चाललेल्या या बैठकीत पक्षाच्या पूर्व, उत्तर आणि दक्षिण योजनांवर चर्चा करण्यात आली. भाजप संघटनेत बदलासोबतच निवडणुकीबाबत नव्या रणनीतीची चर्चाही जोर धरू लागली आहे.
तळागळात योजनांची माहिती द्या...
पुढची निवडणूक मागास, दलित, वंचित आणि शोषित वर्गाच्या प्रश्नावर लढली जाईल, असा स्पष्ट संदेश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या सरकारच्या मंत्र्यांना दिला आहे. त्यासाठी प्रत्येकाने आपापल्या भागात जाऊन या घटकांपर्यंत पोहोचून शासनाच्या कल्याणकारी योजनांची माहिती द्यावी. जो पात्र आहे आणि ज्याला कोणत्याही योजनेचा लाभ मिळालेला नाही, त्याला संबंधित योजनेचा लाभ मिळवून द्यावा, अशा सूचना करण्यात आल्या आहेत.
नड्डा 6,7 आणि 8 जुलै रोजी बैठक घेणार
मिळालेल्या माहितीनुसार, भाजप अध्यक्ष जेपी नड्डा 6 जुलैला पूर्व सेक्टर, 7 जुलैला नॉर्थ सेक्टर आणि 8 जुलैला साऊथ सेक्टरच्या नेत्यांची बैठक घेणार आहेत. पूर्व विभागाची बैठक गुवाहाटी, उत्तरेची दिल्ली आणि दक्षिणेची बैठक हैदराबादमध्ये होणार आहे. या बैठकीला भाजप अध्यक्षांसह प्रदेशाध्यक्ष, प्रदेश प्रभारी, संघटनमंत्री, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, खासदार, आमदार व राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य उपस्थित राहणार आहेत.