BJP Lok Sabha Election : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने काल(दि.2) 16 राज्ये आणि 2 केंद्रशासित प्रदेशांतील 195 उमेदवारांच्या नावांची घोषणा केली. त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा वाराणसीतून, गृहमंत्री अमित शाह गांधीनगरहून, तर लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला राजस्थानमधील कोटा मतदारसंघातून निवडणूक रिंगणात उतरणार आहेत. भोजपुरी स्टार पवन सिंह यांना पश्चिम बंगालच्या आसनसोल मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केली होती, पण आता पवन सिंह यांनी निवडणूक लढवण्यास नकार दिला आहे.
29 फेब्रुवारी रोजी झालेल्या भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीत उमेदवरांची नावे निश्चित करण्यात आली होती. यानंतर भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत भाजपच्या 195 उमेदवारांची घोषणा केली. यात भोजपुर स्टार मनोज तिवारी यांनी दिल्लीतील उत्तर पूर्व, दिनेश लाल यादव उर्फ निरहुवा यांना युपीतील आझमगड आणि पवन सिंह यांना पश्चिम बंगालच्या आसनसोलमधून अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांच्याविरोधात तिकीट देण्यात आले होते. पण, आता त्यांनी निवडणूक लढवण्यास नकार दिला आहे.
पवन सिंह यांनी X वर पोस्ट करत म्हटले की, 'मी भारतीय जनता पक्षाच्या सर्वोच्च नेतृत्वाचे मनापासून आभार व्यक्त करतो. पक्षाने माझ्यावर विश्वास ठेवून मला आसनसोलमधून उमेदवार म्हणून घोषित केले. पण, काही कारणास्तव मी आसनसोलमधून निवडणूक लढवू शकणार नाही...' विशेष म्हणजे, शनिवारी भाजपने तिकीट जाहीर केल्यानंतर पवन सिंह यांनी भाजप हायकमांडचे आभार मानले होते. आता अचानक त्यांनी निवडणूक लढवण्यास नकार दिल्यामुळे सर्वांच्या भूवया उंचावल्या आहेत.