मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ईडीने झारखंडच्या काँग्रेस आमदार अंबा प्रसाद आणि इतरांविरुद्ध रांचीमध्ये छापे टाकले. ईडीच्या छाप्यानंतर, काँग्रेसच्या महिला आमदाराने दावा केला आहे की, भाजपाने त्यांना हजारीबागमधून लोकसभा निवडणूक लढवण्याची ऑफर दिली होती. मात्र भाजपाच्या या ऑफरकडे त्यांनी दुर्लक्ष केलं, त्यानंतर त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली.
अंबा प्रसाद या हजारीबाग जिल्ह्यातील बरकागाव विधानसभा मतदारसंघाच्या आमदार आहेत. अंबा प्रसाद यांनी मंगळवारी दिलेल्या माहितीनुसार, "ईडी सकाळ-सकाळ घरी आली आणि दिवसभर त्रास सहन करावा लागला. त्यांनी मला तासनतास एका जागी उभं केलं. मला भाजपाने हजारीबाग लोकसभेचे तिकीट देऊ केलं, ज्याकडे मी दुर्लक्ष केले, त्यानंतर माझ्या दबाव टाकला गेला."
"आरएसएसच्या अनेक लोकांनी माझ्यावर चतरामधून निवडणूक लढवण्यासाठी दबाव टाकला, मी त्याकडेही दुर्लक्ष केलं. बरकागावची जागा सलग जिंकल्यानंतर ते हजारीबागमध्ये माझ्याकडे एक मजबूत उमेदवार म्हणून पाहतात. पण मी काँग्रेसची आहे. भाजपामधली नाही म्हणून आम्हाला लक्ष्य केलं जात आहे." ईडीने मंगळवारी कथित जमीन आणि ट्रान्सफर-पोस्टिंग घोटाळ्यांशी संबंधित प्रकरणांमध्ये काँग्रेस आमदाराशी संबंधित जागेवर छापे टाकले होते.
रांची येथील अंबा प्रसाद यांच्या घरावर आणि हजारीबागमधील त्यांच्याशी संबंधित परिसरावर छापे टाकण्यात आले. एजन्सीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सकाळी सुरू झालेला हा छापा रात्री उशिरापर्यंत सुरू होता. केंद्रीय अंमलबजावणी संस्थेच्या रांची विभागीय कार्यालयात 2023 मध्ये त्यांच्याविरुद्ध दाखल करण्यात आलेल्या मनी लॉन्ड्रिंगच्या तक्रारीच्या संदर्भात अंबा प्रसाद यांच्या निवासस्थानावर छापा टाकण्यात आला होता.