2018 भाजपासाठी धोक्याचं? तीन राज्यांमधील सत्ता संपुष्टात; दोन राज्यं संकटात
By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2018 10:55 AM2018-06-20T10:55:13+5:302018-06-20T10:57:43+5:30
सध्या 19 राज्यांमध्ये भाजपाची सत्ता
नवी दिल्ली: जम्मू-काश्मीरमध्ये तीन वर्ष दोन महिने आणि अठरा दिवस सत्ता संचलन केल्यावर भाजपानं पीडीपीची साथ सोडली. भाजपाला सत्ता सोडावं लागलेलं 2018 मधील हे तिसरं राज्य ठरलं आहे. तर आणखी दोन राज्यांमधील भाजपाची सत्ता धोक्यात आहे. त्यामुळे यंदाचं वर्ष भाजपासाठी सत्ता संचलनाच्या दृष्टीनं फारसं चांगलं ठरताना दिसत नाही.
मार्च महिन्यात आंध्र प्रदेशच्या सत्तेतील वाटा भाजपाला सोडावा लागला. आंध्र प्रदेशला विशेष दर्जा देण्याच्या मागणीकडे मोदी सरकारनं दुर्लक्ष केलं. त्यामुळे आंध्र प्रदेशातील सत्ताधारी टीडीपीनं एनडीएतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. यामुळे भाजपाच्या मंत्र्यांनी राजीनामा दिला. यानंतर गेल्याच महिन्यात कर्नाटकमध्ये भाजपाला धक्का बसला. कर्नाटकमध्ये भाजपानं सर्वाधिक जागा जिंकल्या. यानंतर येडियुरप्पा यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथही घेतली. मात्र भाजपाला बहुमत सिद्ध करता आलं नाही. त्यामुळे येडियुरप्पा यांनी राजीनामा द्यावा लागला.
काँग्रेसमुक्त भारताची घोषणा देणाऱ्या भाजपाला अनेक राज्यांमधील पोटनिवडणुकीत पराभव पत्करावा लागला आहे. सध्या 19 राज्यांमध्ये भाजपाची सत्ता आहे. यातील 15 राज्यांमध्ये भाजपाचे मुख्यमंत्री आहेत. तर चार राज्यांमध्ये भाजपाच्या मित्रपक्षांकडे मुख्यमंत्रीपद आहे. गेल्याच वर्षी संयुक्त जनता दल एनडीएमध्ये सहभागी आल्यानं बिहारमध्ये भाजपा सत्ताधारी झाला. मात्र बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सध्याची विधानं पाहता त्यांची भाजपासोबतची सोयरिक किती दिवस टिकणार, हा प्रश्न निर्माण झाला आहे.
या वर्षाच्या अखेरीस चार राज्यांमध्ये विधानसभा निवडणूक होणार आहे. यामध्ये मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान आणि मिझोरमचा समावेश आहे. यातील राजस्थान आणि मध्य प्रदेशातील भाजपाची सत्ता धोक्यात आहे. या दोन्ही राज्यांमध्ये भाजपाला काँग्रेसचा सामना करावा लागणार आहे. राजस्थानमध्ये मुख्यमंत्री वसुंधरा राजे आणि पक्षाचं संघटन यांच्यात सगळं आलबेल नाही. तर मध्य प्रदेशात सत्ताविरोधी वातावरणाचा फटका मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहानाला बसू शकतो. मध्य प्रदेशात शेतकऱ्यांचं आंदोलनदेखील जोरात आहे. मात्र छत्तीसगडमधील परिस्थिती भाजपासाठी अनुकूल आहे.