सुंदर हाती कमळ, संबित पात्रांच्या उपस्थितीत खुशबूंचा भाजपा प्रवेश
By महेश गलांडे | Published: October 12, 2020 02:35 PM2020-10-12T14:35:02+5:302020-10-12T14:35:25+5:30
खुशबू यांना काँग्रेस सोडणार का? असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता सध्या याबाबत मी काहीही बोलू इच्छित नाही, असे त्यांनी म्हटलं होतं. त्यामुळे, त्यांच्या पुढील राजकीय वाटचालीकडे सर्वांचे लक्ष लागले होते
मुंबई - अभिनेत्री ते राजकीय नेते असा प्रवास केलेल्या तामिळनाडूतील काँग्रेस नेत्या खुशबू सुंदर यांनी भाजपात प्रवेश केला आहे. सन 2014 पासून त्या काँग्रेस नेता बनून काम करत असून काही दिवसांपूर्वीच भाजपा प्रवेशाचे वृत्त त्यांनी फेटाळले होते. मात्र, आज राजधानी दिल्लीत भाजपा नेत्यांच्या उपस्थितीत त्यांनी भाजपाचे कमळ हाती घेतलं. तत्पूर्वी, सकाळीच त्यांनी आपल्या काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता.
खुशबू यांना काँग्रेस सोडणार का? असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता सध्या याबाबत मी काहीही बोलू इच्छित नाही, असे त्यांनी म्हटलं होतं. त्यामुळे, त्यांच्या पुढील राजकीय वाटचालीकडे सर्वांचे लक्ष लागले होते. तामिळनाडूत 2021 मध्ये विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर तेथील राजकीय घडामोडींना वेग येताना दिसत आहे. त्यातच, खुशबू सुंदर यांच्या रुपाने दक्षिणच्या राजकीय मैदानात भाजपा जोमाने उतरण्यासाठी उत्सुक असल्याचे दिसून येत आहे. दोन दिवसांपूर्वीचं खुशबू यांच ट्विट सोशल मीडियावर व्हायरल होत होतं. त्यावरुन, अनेक चर्चांना उधाण आलं होतं. मात्र, खुशबू यांच्या भाजपा प्रवेशाने सर्व चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.
Delhi: Khushboo Sundar joins Bharatiya Janata Party (BJP).
— ANI (@ANI) October 12, 2020
She had resigned from Congress earlier today. pic.twitter.com/Q6VBlFD6tM
खुशबू यांनी अभिनयाच्या क्षेत्रातून राजकारणात एंट्री करताना सर्वप्रथम 2010 साली त्यांनी डीएमके पक्षात प्रवेश केला होता, त्यावेळी डीएमके सत्ताधारी पक्ष होता. मी महिलांच्या सक्षमीकरणासाठी काम करणार असून जनसेवा करायला मला आवडतं, माझा निर्णय योग्य असल्याचे खुशबू यांनी त्यावेळी म्हटले होते. मात्र, 4 वर्षानंतर काँग्रेस नेत्या सोनिया गांधींची भेट घेऊन त्यांनी 2014 साली काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यावेळी, काँग्रेस पक्षच देशातील नागरिकांचं भलं करू शकतो, काँग्रेसमध्ये आल्यानंतर मला घरी आल्याचा आनंद होत आहे, असेही खुशबू यांनी म्हटले होते. मात्र, 2019 च्या लोकसभा निवडणुकीत खुशबू यांना काँग्रसने तिकीट नाकारले. विशेष म्हणजे या निवडणुकीत काँग्रेस आणि डीएमकेच्या आघाडीला चांगले यश मिळाले होते. त्यामुळे, खुशबू यांनी आगामी विधानसभा निवडणुकांतील संधी लक्षात घेत भाजपाचे कमळ हाती घेतले आहे.
दरम्यान, खुशबू यांच्या भाजपा प्रवेशाचा भाजपाला फायदा होणार का, हे आगामी निवडणुकांतून दिसून येईल.