आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाने १९५ उमेदवारांची पहिली यादी शनिवारी प्रसिद्ध केली होती. मात्र आज पक्षाने काही सुधारणांनंतर आसामसाठी उमेदवारांची एक सुधारित यादी प्रसिद्ध केली. पहिल्या यादीमध्ये भाजपानेआसाममधील १४ लोकसभा जागांमधील ११ जागांवर निवडणूक लढण्याची घोषणा केली.
या यादीमधील काही नावं चुकीची असल्याचे पक्षाने म्हटले आहे. पहिल्या यादीची घोषणा करताना आसाममधील मतदारसंघांची पुनर्रचना झाली असल्याकडेही दुर्लक्ष करण्यात आलं. नव्या यादीमध्ये संसदीय निर्वाचन क्षेत्रांची संख्या आणि नावांची दुरुस्ती करण्यात आली.
नव्या यादीनुसार दिलीप सैकिया दरांग उदलगिरी येथून निवडणूक लढवतील. अमर सिंग तिस्सो दीफू येथून निवडणूक लढवतील. रंजीत दत्ता तेजपूर येथून निवडणूक लढवतील. सुरेश बोरा हे नागांव येथून निवडणूक लढवतील आणि कामाख्या प्रसाद तासा काझिरंगा येथून निवडणूक लढवतील. आसामममधील मंदलदाई आणि कलियाबोरसारख्या सध्या अस्तित्वात नसलेल्या मतदारसंघांचा उल्लेख यादीमध्ये करण्यात आला होता. त्यासमोर उमेदवारांची नावंही देण्यात आली होती. मात्र आता ती वगळण्यात आली आहेत. उर्वरीत तीन जागांपैकी दोन जागा आसाम गण परिषदेला आणि एक जागा बोडोलँड प्रादेशिक पक्षाला देण्यात आली आहे. दिब्रूगड येथून भाजपाने विद्ममान खासदार रामेश्वर तेली यांचं तिकीट कापून ते सर्वानंद सोनोवाल यांना दिलं आहे.