नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीत भोपाळ मतदार संघासाठी भाजपाकडून साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. दरम्यान, नॅशनल कॉन्फरन्सचे नेते ओमर अब्दुल्ला यांनी साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांच्या उमेदवारीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर या दहशतवादाच्या आरोपी आहेत. सध्या त्यांची जामीनावर सुटका झाली आहे. त्यांचा कोर्टाने जामीन रद्द केला पाहिजे, असे ओमर अब्दुला यांनी म्हटले आहे.
लोकसभा निडणुकीसाठी देशात दुसऱ्या टप्प्यातील मतदान आज होत आहे. ओमर अब्दुल्ला यांनी श्रीनगरमध्ये मतदान केले. यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी भाजपा उमेदवार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांच्यावर हल्लाबोल केला. जर साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांची तब्येत ठीक झाली असेल तर त्यांना परत तुरुंगात पाठवले पाहिजे. भोपाळ मतदार संघातून भाजपाने साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांना उमेदवारी दिली आहे. यापेक्षा भाजपाचे मोठे दुर्दैव काय असू शकते, असे ओमर अब्दुला यांनी सांगितले.
दरम्यान, मध्य प्रदेशातील भोपाळ लोकसभा मतदार संघातून काँग्रेसचे उमेदवार दिग्विजय सिंह यांच्याविरोधात साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. भाजपाकडून काल मध्यप्रदेशातील उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली. यामध्ये साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांना भोपाळ मतदार संघातून उमेदवारी देण्यात आली आहे. भाजपाकडून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी निवडणूक लढण्यास तयार असून या कामाला सुरुवात केल्याचे म्हटले आहे.
भोपाळ मतदार संघ भाजपाचा बालेकिल्ला आहे. या मतदार संघात 2014 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपा उमेदवार आलोक सांजर यांनी 7.14 लाखाहून अधिक मताधिक्याने विजयी झाले होते. तर त्यांचे प्रतिस्पर्धी काँग्रेसचे उमेदवार पी.सी.शर्मा यांनी 3.43 लाख मतं मिळाली होती. मात्र, यंदाच्या निवडणुकीत काँग्रेसकडून भोपाळ मतदार संघातून दिग्विजय सिंह यांनी मैदानात उतरविण्यात आले आहे. तर, भाजपाकडून साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांना उमेदवारी देण्यात आली आहे.