मध्य प्रदेश, छत्तीसगढमध्ये भाजप; राजस्थानमध्ये काँग्रेस
By ऑनलाइन लोकमत | Published: October 9, 2018 01:09 AM2018-10-09T01:09:29+5:302018-10-09T01:09:58+5:30
या जनमत चाचणीनुसार मध्यप्रदेशमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत भाजप १४२ जागा (२०१३ च्या निवडणुकीपेक्षा २३ जागा कमी) जिंकण्याची शक्यता आहे. काँग्रेसला ७७ (२०१३ पेक्षा २० जागा अधिक), अन्य पक्षांना ११ जागांवर विजय मिळू शकतो असे या जनमत चाचणीच्या निष्कर्षात म्हटले आहे.
नवी दिल्ली : येत्या नोव्हेंबर, डिसेंबरमध्ये पाच राज्यांत विधानसभा निवडणुका होत असून, त्यापैकी मध्यप्रदेश, छत्तीसगढमध्ये सत्ताधारी भाजप आपला गड कायम राखण्याची तर राजस्थानमध्ये काँग्रेस विजयी होण्याची शक्यता असल्याचा निष्कर्ष टाइम्स नाऊ या वृत्तवाहिनीने वॉररूम स्ट्रॅटेजीच्या सहकार्याने केलेल्या निवडणूकपूर्व पहिल्या जनमत चाचणीतून काढण्यात आला आहे.
या जनमत चाचणीनुसार मध्यप्रदेशमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत भाजप १४२ जागा (२०१३ च्या निवडणुकीपेक्षा २३ जागा कमी) जिंकण्याची शक्यता आहे. काँग्रेसला ७७ (२०१३ पेक्षा २० जागा अधिक), अन्य पक्षांना ११ जागांवर विजय मिळू शकतो असे या जनमत चाचणीच्या निष्कर्षात म्हटले आहे. या राज्यात भाजपला ४४ टक्के, काँग्रेसला ३५ टक्के, इतर पक्षांना २१ टक्के मत मिळू शकतात. मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान हे सलग १५ वर्षे सत्तेत असून, त्यांच्याकडून सत्ता हिसकावून घेण्याइतकी ताकद या राज्यात काँग्रेसमध्ये अजूनही नाही. मध्यप्रदेशच्या आगामी विधानसभा निवडणुकांत एबीपी-सी व्होटरच्या चाचणीनुसार भाजपला १०८, काँग्रेसला १२२, इतर पक्षांना ० जागा मिळतील. या राज्यात पोल आॅफ पोल्सच्या जनमत चाचणीनुसार भाजपला १२५, काँग्रेसला १०० व अन्य पक्षांना ५ जागा मिळतील.
भाजपलाच पुन्हा सत्तेची आशा
छत्तीसगढमध्ये भाजपला ४७, काँग्रेसला ३३ व बसपा-जेसीसीला मिळून ११ जागा मिळतील. एबीपी-सी व्होटरच्या चाचणीनुसार भाजपला ४०, काँग्रेसला ४७, बसपा-जेसीसीला मिळून ३ जागा मिळतील. पोल आॅफ पोल्सच्या जनमत चाचणीनुसार भाजपला ४३, काँग्रेसला ४० व बसपा-जेसीसीला मिळून ७ जागा मिळण्याची शक्यता आहे.
सत्तापालट होऊ शकतो
राजस्थानमध्ये विधानसभा निवडणुकांत टाइम्स नाऊने वॉररूम स्ट्रॅटेजीच्या सहकार्याने केलेल्या जनमत चाचणीच्या निष्कर्षानुसार काँग्रेसला ११५, भाजपला ७५ व अन्य पक्षांना १० जागा मिळण्याची शक्यता आहे. या राज्यात मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांच्या कारभारावर तेथील जनता अतिशय नाराज असून त्यामुळे तिथे सत्तापालट होऊ शकतो.