नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकांसाठीचा भाजपचा जाहीरनामा म्हणजे एकाकी, दूरदृष्टी नसलेल्या व अहंकारी वृत्तीच्या व्यक्तीचा जाहीरनामा आहे, अशी टीका काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर केली आहे. तुम्ही खुल्या चर्चेचे आव्हान स्वीकारायला तयार नाही, म्हणजे घाबरत आहात, असेही त्यांनी म्हटले आहे.
राहुल गांधी यांनी टिष्ट्वटमध्ये म्हटले आहे की, अनेकांशी सविस्तर चर्चा करूनच काँग्रेसने लोकसभा निवडणुकांसाठी जाहीरनामा तयार केला. देशातील कोट्यवधी लोकांच्या भावना या जाहीरनाम्यातून व्यक्त झाल्या आहेत. भाजपचा जाहीरनामा मात्र बंद दाराआड तयार करण्यात आला आहे. एकाकी पडलेल्या माणसाच्या विचारांचे प्रतिबिंब त्यात उमटले आहे. राहुल गांधी यांनी आतापर्यंत दोनदा खुल्या चर्चेचे आव्हान पंतप्रधानांना दिले आहे. त्यावर नरेंद्र मोदी यांनी काहीही उत्तर दिलेले नाही. त्याचा उल्लेख करून, मोदी बहुधा चर्चेला घाबरत असावेत. त्यामुळे चर्चेचा विषय आधी ठरवू, त्यात राफेल घोटाळा, निरव मोदी व नोटाबंदी आणि अमित शहा एवढेच विषय ठरवू, असे नवे आव्हान राहुल यांनी दिले आहे.भाजपचे संकल्पपत्र हा निव्वळ थापेबाजीचा नमूना आहे. त्याऐवजी भाजपने माफीनामा प्रसिद्ध केला असता तर बरे झाले असते, अशी टीका काँग्रेसने केली होती. त्यानंतर राहुल गांधी यांनी मोदींवरच शरसंधान केले आहे. काँग्रेसने जाहीर केलेली न्याय योजना फोल असून गेली सत्तर वर्षे गरिबी हटविण्याची आश्वासने देऊन हा पक्ष जनतेला मूर्ख बनवत आला आहे असे शरसंधान भाजपने केले होते. त्यामुळे भाजपच्या जाहीरनाम्यावरही काँग्रेसकडून तिखट टीका होणार हे अपेक्षितच होते.