BJP Manifesto Lok Sabha Election 2024 India Railways: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या न्याय पत्र जाहीरनाम्यानंतर आता भाजपाने संकल्प पत्र जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. या जाहीरनाम्यामध्ये मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, भाजपा अध्यक्ष जे.पी.नड्डा यांच्या उपस्थितीत दिल्लीमध्ये जाहीरनामा घोषित केला. भारतीय रेल्वेसाठी आणि प्रवाशांसाठीही यात मोठी आश्वासने देण्यात आली आहेत.
लोकसभा निवडणुकीत भाजपाने ४०० पार जागांचे लक्ष्य ठेवले आहे. अर्थसंकल्पात रेल्वेसाठी जेवढ्या घोषणा झाल्या नसतील, त्यापेक्षा कितीतरी जास्त पटीने भाजपाने जाहीरनाम्यात प्रवाशांना आश्वासने दिली आहेत. ट्रेनची संख्या वाढवणे, वंदे भारत ट्रेनचा विस्तार, तीन नवीन बुलेट ट्रेन यांसारख्या मोठ्या घोषणा भाजपाने आपल्या संकल्प पत्रातून केल्या आहेत.
भाजपाचे सरकार आल्यास भारतीय रेल्वेसाठी काय करणार?
भाजपाचे सरकार सत्तेत आले तर आगामी १० वर्षात ३१ हजार किमीचा रेल्वेमार्ग बांधला जाईल. दरवर्षी ५ हजार किमीचे नवीन ट्रॅक बांधले जातील. तसेच २०३० पर्यंत रेल्वेत प्रवाशांना नेण्याच्या क्षमतेत वाढ केली जाणार आहे. ज्यामुळे वेटिंग तिकिटांचा प्रश्न मिटवता येऊ शकेल. ट्रेनसेवांची संख्या, डब्यांची संख्या आणि रेल्वेचा वेग वाढवण्यात येईल, अशी ग्वाही भाजपाने प्रवाशांना जाहीरनाम्यातून दिली आहे.
वंदे भारत ट्रेनची तीन मॉडेल्स आणि तीन बुलेट ट्रेन
वंदे भारत ट्रेनबाबत रेल्वेने अनेक मोठी आश्वासने दिली आहेत. वंदे भारत आणि वंदे भारत स्लीपर ट्रेनची संख्या वाढवण्याचे आश्वासन भाजपने दिले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, वंदे भारत ट्रेनची सेवांचा विस्तार देशाच्या कानाकोपऱ्यापर्यंत करण्यात येईल. वंदे भारत चेअरकार, स्लीपर आणि वंदे भारत मेट्रो ट्रेन, अशा तीन मॉडेलवर देशातील वंदे भारत ट्रेन चालवल्या जाणार आहेत. बुलेट ट्रेनसंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घोषणा केली. देशातील तीन भागांत बुलेट ट्रेन सुरु करण्यात येणार आहेत. याशिवाय आधुनिक रेल्वे स्टेशन, रेल्वेचे सुपर ॲप अशा अनेक मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत.
दरम्यान, अहमदाबाद-मुंबई बुलेट ट्रेनचे काम सुरु आहे. ही ट्रेन पश्चिम भागात सुरु करण्यात आली आहे. तसेच देशातील आणखी काही भागांत बुलेट ट्रेन सुरू करण्यात येणार आहेत. त्यासाठी लवकर सर्व्हेचे काम सुरु होणार आहे. अशी माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली.