नवी दिल्ली - जम्मू काश्मीरमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी भाजपानं कंबर कसली आहे. याठिकाणी भाजपानं उमेदवारी यादी जाहीर केली. मात्र काही तासांत ती पुन्हा मागे घेऊन नवीन यादी समोर आणली. जम्मू काश्मीरमध्ये विजयी होण्यासाठी भाजपानं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ९ ते १२ सभा आयोजित करण्याचं ठरवलं आहे. त्यातील ८ ते १० सभा जम्मूत तर काश्मीर खोऱ्यात १ किंवा २ सभा घेतल्या जातील.
जम्मू काश्मीर विधानसभा निवडणुकीसाठी भाजपानं बूथ स्तरावरील कार्यकर्त्यांना कामाला लावलं आहे. कोणत्या मतदारसंघात पंतप्रधान मोदींची रॅली आयोजित करायची याची माहिती पक्षाकडून घेतली जात आहे. मतदारांवर जास्तीत जास्त प्रभाव पाडण्यासाठी भाजपा प्रयत्न करत आहे. त्यानुसार भाजपाची निवडणूक रणनीती सुरू आहे. भाजपानं आज जम्मू काश्मीरातील ९० पैकी ४४ जागांवर उमेदवारी यादी घोषित केली. परंतु काही तासांत ती मागे घेतली.
पुन्हा भाजपाने नवी यादी जारी केली. त्यात पहिल्या टप्प्यातील १५ उमेदवारांची नावे देण्यात आली. पहिल्या टप्प्यातील निवडलेल्या उमेदवार यादीत बदल नाही. १५ उमेदवारांच्या यादीत सैयद शौकत गयूर अंद्राबी, अर्शीद भट्ट, मोहम्मद रफीक वानी, वीर सराफ, सुनील शर्मा आणि शक्ती राज परिहार यांच्या नावाचा समावेश आहे. भाजपाच्या मागे घेतलेल्या यादीत ३ प्रमुख नावे गायब होती. ज्यात जम्मू काश्मीरचे भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंदर रैना, माजी उपमुख्यमंत्री निर्मल सिंह, कविंदर गुप्ता यांचाही समावेश नव्हता. पहिल्या यादीत २ काश्मिरी पंडीत आणि १४ मुस्लीम उमेदवारांचा भाजपाने समावेश केला आहे.
३ टप्प्यात होणार जम्मू काश्मीरच्या निवडणूका
जम्मू काश्मीरमध्ये १९ सप्टेंबर, २५ सप्टेंबर आणि १ ऑक्टोबरला अशा ३ टप्प्यात निवडणुकीसाठी मतदान पार पडणार आहे. मतमोजणी ४ ऑक्टोबरला होणार आहे. तर राज्यात काँग्रेस, एनसी आणि पीडीपीही उमेदवारांची घोषणा लवकरात लवकर करणार आहे.