नवी दिल्ली: भाजपाचे खासदार शत्रुघ्न सिन्हा यांनी पक्षातून हकालपट्टी होण्याची शक्यता आहे. शत्रुघ्न सिन्हा यांनी आतापर्यंत अनेकदा स्वत:च्या पक्षाविरोधात भूमिका घेतली आहे. पंतप्रधान मोदी व अमित शहा यांच्या निर्णयांवरही त्यांनी अनेकदा टीका केली आहे. त्यामुळे शत्रुघ्न सिन्हा हे पक्षाला डोईजड झाले आहेत. अशातच त्यांनी बुधवारी रात्री राष्ट्रीय जनता दलाने (राजद) आयोजित केलेल्या इफ्तार पार्टीला हजेरी लावल्याने पक्षातील त्यांच्याविरुद्धचा रोष वाढला आहे. 'राजद'च्या या इफ्तार पार्टीत लालूंची कन्या मिसा भारती यांनी शत्रुघ्न सिन्हा यांना पक्षाकडून लोकसभेची उमेदवारी देण्याचीही तयारी दर्शविली. आम्ही शत्रुघ्न सिन्हा यांना पाटणा साहिब मतदारसंघातून उमेदवारी द्यायला तयार असल्याचे मिसा यांनी म्हटले.भाजपाचे प्रदेशाध्यक्ष नित्यानंद राय यांनी शत्रुघ्न सिन्हा यांना कारवाईचा इशारा दिला आहे. ते गुरुवारी प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी म्हटले की, शत्रुघ्न सिन्हा यांचे आता पक्षात थोडेच दिवस शिल्लक राहिले आहेत. योग्य वेळ येईल तेव्हा आम्ही त्यांच्याविरुद्ध कारवाई करू, असे राय यांनी सांगितले. मात्र, शत्रुघ्न सिन्हा यांनी भाजपा सोडण्याच्या वृत्ताचा इन्कार केला. परंतु, त्यांनी लालूप्रसाद यादवांच्या मुलांचे कौतुक केले. लालू प्रसाद यांची मुलेही त्यांच्यासारखीच असल्याचे सांगत सिन्हा यांनी पुन्हा एकदा यादव परिवाराशी असलेले जिव्हाळ्याचे संबंध अधोरेखित केले.
भाजपा करणार शत्रुघ्न सिन्हांची हकालपट्टी?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2018 12:02 PM