उत्तर प्रदेशातील मुरादाबादचे महापौर विनोद अग्रवाल हे रक्तदान करण्यासाठी भाजपा कार्यालयात पोहोचले आणि बेडवर झोपले. यानंतर कार्यकर्त्यांनी व्हिडीओ आणि फोटो काढायला सुरुवात केली. पण महापौरांनी रक्तदान केलंच नाही. रक्तदान करण्यापूर्वीच्या या फोटोसेशननंतर महापौर हसत हसत उभे राहिले. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून महापौरांच्या या कृतीवर युजर्सनी कमेंट करण्यास सुरुवात केली आहे.
व्हिडीओ व्हायरल झाल्यावर आता विनोद अग्रवाल यांनी यावर स्पष्टीकरण दिलं आहे. हार्ट पेशंट आणि डायबेटीस असल्याने डॉक्टरांनी रक्तदान करण्यास मनाई केली होती असं सांगितलं. डॉक्टरांनी आधी विनोद अग्रवाल यांचे बीपी तपासले, त्यानंतर रक्तदानाची प्रक्रिया सुरू केली, मात्र रक्तदान करण्यापूर्वी महापौर जोरात हसायला लागले. म्हणाले, डॉक्टरसाहेब, सोडा, आम्ही असंच आलो आहोत.
महापौरांनी रक्तदानाची 'एक्टिंग' केल्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. त्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. अनेकांनी टीकेची झोड उठवली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपातर्फे रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. शिबिरामध्ये भाजपाच्या अनेक कार्यकर्त्यांनी रक्तदान केलं
जिल्हा रुग्णालय मुरादाबादच्या मुख्य अधीक्षक डॉ. संगीता गुप्ता यांनी सांगितलं की, रक्तदानासाठी प्रोटोकॉल आहेत. ज्यामध्ये १८ ते ५५ वयोगटातील कोणतीही निरोगी व्यक्ती रक्तदान करू शकते. यानंतर आम्ही सर्व रक्ताची तपासणी करतो. इनफेक्टेड ब्लड दुसरीकडे जाऊ नये याची काळजी घेतो.