नवी दिल्ली: लोकसभा निवडणुकीला अजून अडीच वर्षे बाकी आहेत. पण, भारतीय जनता पक्षाने यासाठी आतापासूनच तयारी सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर दिल्लीत भाजपने मेगाबैठक आयोजित केली आहे. या बैठकीला भाजपच्या सर्व दिग्गज नेत्यांसह भाजपशासित राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित आहेत. पंतप्रधान मोदीही बैठकस्थिली पोहोचले आहेत.
या बैठकीत केंद्र सरकारची धोरणे आणखी प्रभावी कशी करता येतील आणि केंद्र सरकारच्या योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचत आहेत की नाही, यावरही विचारमंथन होणार आहे. 2024 बरोबरच आगामी विधानसभा निवडणुकांवर विचारमंथन करणे हे या बैठकीचे मुख्य उद्दिष्ट आहे.
केंद्र सरकारच्या योजनांचा प्रभाव, उत्तम प्रशासन, तिरंगा योजना, राज्यांमधील परस्पर समन्वय कसा वाढवता येईल, याचा समावेश बैठकीच्या अजेंड्यात आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काही राज्ये चांगली कामगिरी करत आहेत, तर काही राज्यांची कामगिरी सुधारण्याची गरज आहे, याचाही आढावा बैठकीत घेतला जाईल.
या बैठकीला उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य, उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान, हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर, गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित आहेत.