लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : लोकसभेसाठी महाराष्ट्रातील उमेदवारांच्या समावेशाची अपेक्षा असलेल्या भाजपच्या दुसऱ्या यादीकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. या यादीतील उमेदवारांची नावे ठरविण्यासाठी पक्षाच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक रविवारी हाेऊ शकते.
भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीत महाराष्ट्र, बिहार, कर्नाटक, हरयाणा आणि ओडिशाच्या उमेदवारांची निवड अपेक्षित आहे. मात्र, महायुतीच्या जागावाटपाची चर्चा अपूर्ण राहिल्यामुळे या बैठकीत गेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपने लढलेल्या २५ जागांवर उमेदवारांची निवड हाेणार काय, याची उत्सुकता लागली आहे. महायुतीतील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा दावा नसलेल्या जागांवर उमेदवारांच्या नावांची घोषणा होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.