नवी दिल्ली: राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा कार्यकाळ जुलै अखेरीस संपत आहे. त्यांच्या जागी कोणाला संधी मिळणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. आगामी राष्ट्रपतिपद महिलेला मिळू शकेल. विशेषत: आदिवासी महिलेला संधी दिली जाऊ शकते. पंतप्रधान नरेंद्र मोदी अनेकदा आश्चर्यकारक निर्णय घेतात. गेल्या वेळी झालेल्या निवडणुकीत तेच दिसून आलं. कोविंद यांच्या नावाची कोणतीच चर्चा नसताना मोदींनी त्यांची निवड केली.
राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपतीपद आतापर्यंत आदिवासी महिलेनं भूषवलेलं नाही. भाजप नेतृत्त्वाकडून ज्या नावांचा विचार करतंय त्यात लोकसभेच्या माजी अध्यक्षा सुमित्रा महाजन, उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल, छत्तीसगडच्या राज्यपाल अनुसूया उईके, तेलंगणच्या राज्यपाल तमिलसाई सुंदरराजन आणि झारखंडच्या राज्यपाल द्रौपदी मुर्मू यांचा समावेश आहे. यापैकी मुर्मू आणि उईके आदिवासी समाजाच्या आहेत.
गेल्या महिन्याभरात पंतप्रधान मोदींनी यापैकी बहुतांश जणींची स्वतंत्रपणे प्रदीर्घ भेट घेतली आहे. ओदिशाच्या रहिवासी द्रौपदी भाजपच्या अनुसूचित जनजाती मोर्चाच्या दीर्घकाळ उपाध्यक्षा होत्या. बिजू जनता दलासोबतच्या भाजप युतीच्या सरकारमध्ये २००२ ते २००४ दरम्यान त्या मंत्री राहिल्या आहेत. तर आनंदीबेन पटेल या गुजरातच्या मुख्यमंत्री आणि छत्तीसगड, मध्य प्रदेशच्या राज्यपाल होत्या.
सध्याच्या घडीला पंतप्रधान, राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, लोकसभा अध्यक्ष या चारही महत्त्वाच्या पदांवर पुरुष आहेत. त्यामुळे राष्ट्रपती, उपराष्ट्रपती पदासाठी महिलेला संधी दिली जाऊ शकते. बिहार, उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजपनं चांगली कामगिरी केली. दोन्ही राज्यांत भाजपची सत्ता कायम राहिली. त्यामागे महिला मतदारांचा मोठा वाटा आहे. त्यामुळेही महिलेला संधी देण्याचा विचार भाजपकडून केला जात आहे.