गुजरात भाजपा सरकारमधील मंत्री अरविंद रैयानी यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असल्याचं समोर आले आहे. यात मंत्री रैयानी स्वत:लाच लोखंडी साखळीनं मारत असल्याचं दिसून येते. हा व्हिडीओ समोर आल्यानंतर विरोधी पक्ष काँग्रेसनंभाजपा मंत्र्यांवर अंधविश्वासाला खतपाणी घालत असल्याचा आरोप केला. तर अंधविश्वास आणि आस्था यात खूप अंतर आहे. जे समजायला हवं असा प्रतिटोला भाजपाने काँग्रेसला लगावला.
अरविंद रैयानी हे गुजरात सरकारमधील परिवहन, नागरी वाहतूक आणि पर्यटन मंत्री आहेत. रैयानी यांचा कथित व्हिडीओ शुक्रवारी सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यात स्वत: भाजपा मंत्री लोखंडी साखळीनं मारत असल्याचं आढळलं. भाजपा नेत्याने व्हायरल व्हिडीओवर स्पष्टीकरण देताना सांगितले की, राजकोट इथं वडिलांच्या गावी कुलदैवताच्या मंदिरात आयोजित कार्यक्रमात त्यांनी भाग घेतला होता. देवतांच्या पूजेसाठी धार्मिक प्रथा परंपरेनुसार मी प्रार्थना करत होतो. गेल्या १६ वर्षापासून मी या कार्यक्रमात सहभाग घेतोय असं त्यांनी म्हटलं.
काँग्रेसचा हल्लाबोलहा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाल्यानंतर काँग्रेसला भाजपावर टीका करण्याची आयती संधी सापडली. काँग्रेसचे प्रवक्ते मनिष दोशी म्हणाले की, मंत्रिपदावर असताना अरविंद रैयानी यांनी अंधश्रद्धेला खतपाणी घालत लोकांमध्ये अंधविश्वास पसरवला आहे. गुजरात सरकारमध्ये मंत्री पदावर जबाबदारी असताना त्यांनी हे कृत्य करणं अतिशय दुर्भाग्यपूर्ण आहे असा आरोप काँग्रेसनं केला.
भाजपानं दिलं स्पष्टीकरणगुजरात भाजपाने काँग्रेसच्या आरोपाला स्पष्टीकरण देताना सांगितले की, विरोधी पक्षाला श्रद्धा आणि अंधश्रद्धा यातील अंतर समजून घ्यायला हवं. हे एखाद्याचं वैयक्तिक धार्मिक विचार आहेत. त्यांची श्रद्धा आहे. श्रद्धा आणि अंधश्रद्धा यात फरक सांगण्यासाठी अनेक गोष्टी असतात. प्रत्येकजण आपापली पूजा त्यांच्यापरीने करत असतात. पारंपारिक धार्मिक प्रथांना अंधश्रद्धा म्हणणं योग्य नाही. काँग्रेसनं धार्मिक भावनांना दुखावणं सोडलं पाहिजे असं प्रत्युत्तर भाजपाने दिले आहे.