केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह (Jitendra Singh) यांनी पाकव्याप्त काश्मीरबाबत (POK) मोठं वक्तव्य केलं. ज्या प्रकारे कलम ३७० हटवलं, त्याप्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकार पाकव्याप्त काश्मीरला स्वातंत्र्य मिळवून देण्याचा संकल्प पूर्ण करेल असं वक्तव्य त्यांनी केलं. याशिवाय जितेंद्र सिंह यांनी काश्मिरी पंडितांवर आधारित असलेल्या द काश्मीर फाईल्स (The Kashmir Files) या चित्रपटावर केलेल्या टीकांवरून नॅशनल कॉन्फरन्सवर निशाणा साधला.
जितेंद्र सिंह यांनी कठुआमध्ये जम्मू काश्मीरचे संस्थापक महाराज गुलाब सिंग यांच्या २० फुट उंच प्रतिमेचं अनावरण केलं. जम्मू काश्मीरचे प्रसिद्ध मूर्तिकार पद्मश्री रविंदर जामवाल यांनी घोड्यावर बसलेल्या महाराज गुलाब सिंह यांचा कास्याचा पुतळा तयार केला आहे. "१९८७ च्या निवडणुकांमध्ये झालेल्या गैरव्यवहारामुळे जम्मू काश्मीरमध्ये दहशतवादाला थारा मिळाला," असंही जितेंद्र सिंह म्हणाले.
"... तो आमचा संकल्प""१९९४ मध्ये आवाजी मतदानानं संसदेत प्रस्ताव पारित करण्यात आला होता. यामध्ये पाकिस्तानचा अवैध कब्जा असलेला जम्मू काश्मीरचा हिस्सा रिकामा करावा लागेल असं म्हटलं होतं. पाकव्याप्त काश्मीरला स्वतंत्र करणं आमचा संकल्प आहे," असंही ते म्हणाले. "कलम ३७० रद्द केलं आणि भाजपनं यासंदर्भात आश्वासन दिलं होतं. हे काही लोकांच्या कल्पनेच्या पलिकडील होतं. १९८० मध्ये माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपपेयी यांनी भाजपाचा विजय होईल असा अंदाज बांध होता, हेदेखील काही लोकांच्या कल्पनेच्या पलिकडचं होतं. मोदी सरकारनं सत्ता सांभाळली आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली भाजप पाकिस्तानच्या ताब्यातील जम्मू काश्मीर स्वतंत्र करण्यासह आपली आश्वासनं पूर्ण करेल," असंही सिंह म्हणाले.