नवी दिल्ली - राजकीय पक्षांच्या प्रचाराची रंगत वाढत चालली आहे. प्रचारसभांमधून अनेक नेते एकमेकांवर घणाघाती टीका करताना पाहायला मिळत आहेत. तर अनेक ठिकाणी नेते मंडळी वादग्रस्त वक्तव्य करतं आहेत. लोकसभा निवडणुकीदरम्यान मध्य प्रदेशमध्ये आयोजित करण्यात आलेल्या प्रचारसभेत भाजपाच्या एका नेत्याची जीभ घसरली आहे. भाजपाचे मध्य प्रदेशमधील अध्यक्ष राकेश सिंह यांनी बुधवारी (24 एप्रिल) एका प्रचारसभेत दहशतवाद हा त्याग, तपस्या आणि बलिदानाचं प्रतिक असल्याचं म्हटलं आहे.
राकेश सिंह यांना भगवा म्हणायचे होते. मात्र भाषण करत असताना त्यांची जीभ घसरली व ते भगव्या ऐवजी दहशतवाद बोलून चुकले. भाजपाच्या भोपाळच्या उमेदवार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांना उमेदवारी दिल्यानंतर विरोधकांनी त्यांना दहशतवादी म्हटले होते. त्यांच्या टीकेला उत्तर देताना राकेश सिंह यांची जीभ घसरली. 'भगवा कधीही दहशतवाद होऊ शकत नाही. भगवा धारण करणारी व्यक्ती कधीही दहशतवादी होऊ शकत नाही. दहशतवाद हा प्रेम, तपस्या आणि बलिदानाचे प्रतिक आहे.’ असे वक्तव्य राकेश सिंह यांनी केले आहे. त्यांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
... तर तुमचं बोट सलामत राहणार नाही, केंद्रीय मंत्र्याची धमकी
केंद्रीयमंत्री मनोज सिन्हा यांनी भाजपाच्या प्रचारसभेत बोलताना काही दिवसांपूर्वी विरोधकांना थेट धमकी दिली होती. भाजपा कार्यकर्त्यांनाकडे बोट दाखवल्यास पुढील 4 तासांत तुमचं बोट (सलामत) जागेवर राहणार नाही, अशी सज्जड दमच सिन्हा यांनी दिला होता. गाझीपूरमधील सदीपुरा येथील किसान पंचायत संमेलनात भाषण करताना सिन्हा यांनी धमकी दिला होता. भाजपा नेते आणि कार्यकर्ते भ्रष्ट्राचार आणि गुन्हेगारी पार्श्वभूमीतून तयार होणाऱ्या पैशाचा नायनाट करण्यास सक्षम आहेत. पूर्वांचलमधील कुणीही गुन्हेगार, कुणाचीही लायकी नाही की गाझीपूर येथे येऊन भाजपा कार्यकर्त्यांकडे बोट दाखवावे. तसे केल्यास त्यांचे बोट सलामत राहणार नसल्याचे सिन्हा यांनी म्हटले होते. सिन्हा यांच्या या वक्तव्यामुळे विरोधकांनी त्यांचा चांगलाच समाचार घेतला होता.
साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांना खोट्या आरोपाखाली फसविले - अमित शहा
मुंबई दहशतवादी हल्ल्यातील शहीद हेमंत करकरे यांच्याबद्दल आक्षेपार्ह टिप्पणी केल्याप्रकरणी भोपाळ लोकसभा मतदार संघातील भाजपाच्या उमेदवार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांच्यावर टीका होत आहे. मात्र, साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांचा बचाव करण्यासाठी भाजपा अध्यक्ष अमित शहा सरसावले होते. साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांना खोट्या आरोपाखाली फसविले आहे, असा अमित शहा यांनी म्हटले होते. हिंदू दहशतवादाच्या नावाने एक बोगस केस तयार करण्यात आली. जगात देशाच्या संस्कृतीची बदनामी करण्यात आली. कोर्टात खटला चालल्यानंतर तो बोगस असल्याचे स्पष्ट झाले, असे अमित शहा म्हणाले. तसेच, स्वामी असीमानंद आणि अन्य लोकांवर खोट्या आरोपांखाली गुन्हे नोंद झाले. समझौता एक्स्प्रेसमध्ये स्फोट करणारे लोक कुठे आहेत. ज्या लोकांना पकडले त्यांना का सोडले, असे सवाल अमित शहा यांनी उपस्थित केले होते.