ऑनलाइन लोकमत
हरियाणा, दि. 14 - खादी ग्रामोद्योगाच्या कॅलेंडर आणि डायरीनंतर आता नोटेवरुनही महात्मा गांधींचं छायाचित्र हटवण्यात येईल असं खळबळजनक वक्तव्य करत अनिल वीज यांनी नवा वाद निर्माण केला आहे. अनिल वीज हरियाणा सरकारमध्ये आरोग्यमंत्री आहेत. खादी ग्रामोद्योगाच्या कॅलेंडर आणि डायरीवरून महात्मा गांधी यांचे छायाचित्र हटवून त्या जागी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे छायाचित्र छापण्यात आल्याने वाद निर्माण झाला होता. त्यानंतर आता अनिल वीज यांच्या वक्तव्याने हा वाद अजून वाढण्याची शक्यता आहे.
'खादीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महात्मा गांधींपेक्षा मोठा ब्रॅण्ड आहेत', असंही अनिल वीज बोलले आहेत. 'पंतप्रधान नरेंद्र मोदी खादी उद्योगाशी जोडले गेले तेव्हापासून विक्रीत 14 टक्क्यांनी वाढ झाल्याचंही', अनिल वीज यांनी सांगितलं आहे. अंबाला येथे एका सार्वजनिक कार्यक्रमात बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.
'खादी ही महात्मा गांधींची मालकी नाही. महात्मा गांधींमुळे खादी उत्पादनांमध्ये आणि चलनात घसरण झाली असल्याचंही', त्यांनी म्हटलं आहे. 'जेव्हापासून महात्मा गांधी चलनावर दिसू लागले तेव्हापासून घसरणीला सुरुवात झाली. नोटेवरुनही त्यांचं छायाचित्र काढून टाकण्यात येणार आहे', असा दावा त्यांनी केला आहे.
दरम्यान त्यांच्या या वक्तव्यावर गांधींचे पणतू तुषार गांधी यांनी 'हे वक्तव्यच बाष्कळ आहे. पण ज्याप्रकारे राजकाराणी पैशाचा वापर चुकीच्या कामांसाठी करतात ते पाहता त्यांना हटवणं योग्य राहिल', असं म्हणत टोला हाणला आहे. तर लालूप्रसाद यादव यांनी हे देशाची नालायक मुलं असल्याचं म्हटलं आहे.
या सर्व वादानंतर अनिल वीज यांनी हे माझं वैयक्तिक मत होतं, कोणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नसल्याचं सागंत माफी मागितली आहे.