इंदूर: आठ पोलिसांचं हत्याकांड घडवणारा कुख्यात गुंड विकास दुबेच्या एन्काऊंटर बोलताना भाजपाचे मंत्री स्वपक्षीय नेत्यांवर घसरले. त्यांनी थेट पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांवर घणाघाती टीका केली. त्यांच्या विधानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगानं व्हायरल झाला. मात्र हा व्हिडीओ एडिटेड असल्याची सारवासारव त्यांनी केली. या प्रकरणी कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.विकास दुबेच्या एन्काऊंटरबद्दल माध्यमांशी बोलताना मध्य प्रदेशचे जलसंपदा मंत्री तुलसी सिलावट थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्यावर बरसले. पंतप्रधान आणि मध्य प्रदेश, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री समाजासाठी कलंक असल्याची टीका सिलावट यांनी केली. सिलावट आधी काँग्रेसमध्ये होते. अवघ्या काही महिन्यांपूर्वी त्यांनी काँग्रेसचा हात सोडला. ते ज्योतिरादित्य सिंधिया यांच्यासोबत बाहेर पडले. त्यानंतर त्यांनी मंत्रिमंडळात स्थान देण्यात आलं.'देशाचे पंतप्रधान, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री, असे लोक समाजासाठी कलंक आहेत. अशा लोकांचं काय करायचं, ही सरकारची जबाबदारी आहे. मात्र ही घटना आपल्या समाजासाठी प्रेरणादायीदेखील आहे. अशा प्रकारची कृत्यं करणाऱ्यांविरोधात कारवाई व्हायला हवी. आमच्या सरकारमध्ये अपराध्यांना जागा नाही. मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी या प्रकरणी कठोरपणा दाखवत अटकेची कारवाई केली. सरकार अपराध्यांना कधीही माफ करत नाही,' असं सिलावट यांनी व्हिडीओमध्ये म्हटलं आहे.पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांवर टीका करतानाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानं सिलावट अडचणीत आले. त्यानंतर त्यांनी काँग्रेसवर आरोप केले. आपल्या वक्तव्यातील शब्द मागेपुढे करून व्हिडीओ व्हायरल करण्यात आल्याचा आरोप सिलावट यांनी केला. मी विकास दुबेसाठी कलंक शब्द वापरला होता. पंतप्रधान आणि मुख्यमंत्री विकास पुरुष आहेत. ते माझे नेते असून मी त्यांचा आदर करतो, अशी सारवासारव सिलावट यांनी केली.
मोदी, योगी म्हणजे समाजासाठी कलंक; भाजपाच्या मंत्र्याची आपल्याच नेत्यांवर टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2020 2:55 PM