नवी दिल्ली : देशात पेट्रोल, डिझेलचे भाव नव्वदीपार गेल्यानंतर निवडणुकीपूर्वीचा जनतेचा रोष पाहून केंद्र सरकारने 2.5 रुपयांनी इंधनाचे दर कमी केले. तसेच राज्यांनाही कमी करण्यास सांगितले. मात्र, एवढे दर वाढूनही दरवाढीचे समर्थन करणाऱ्या भाजप नेत्यांनी आता दर कमी न करणाऱ्या राज्य सरकारांविरोधात उलट्या बोंबा मारायला सुरुवात केली आहे.
केंद्रीय मंत्री विजय गोयल यांनी आज दिल्ली राज्य सरकारने पेट्रोल, डिझेलचे दर कमी न केल्याविरोधात बैलगाडीवरून मोर्चा काढला. चांदनी चौकामध्ये हा मोर्चा काढण्यात आला होता. गोयल यांनी यापूर्वी 2011 मध्ये काँग्रेस सरकारने इंधनाचे दर वाढविले होते तेव्हा मोटारसायकल वरून मोर्चा काढला होता. तेव्हा पेट्रोल आजच्या 81. 68 रुपयांच्या तुलनेत अवघे 63.67 रुपये होते.
दुसरीकडे, भाजपच्या केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनीही भुवनेश्वरमध्ये ओडीशाच्या मुख्यमंत्र्यांवर टीका केली. नवीन पटनायक आडमुठेपणा करत असून आयुष्मान भारत आणि पेट्रोल, डिझेलची किंमत कमी करत नसल्याचा आरोप केला आहे. मात्र, इंधन दरवाढीवेळी त्यांनी याचे समर्थन केले होते. मात्र, काँग्रेस सरकारच्या काळात महागाई, इंधन दरवाढीविरोधात दिल्लीमध्ये आंदोलने केली होती.