नवी दिल्ली- भाजपाचे नेते दलित समुहातील लोकांच्या घरी जातात, त्यांच्या घरी त्यांच्याबरोबर जेवतात. पण दलित समुहाची उन्नती करण्यासाठी इतकं पुरेसं नाही. नेत्यांनी दलित समुहातील लोकांना स्वतःच्या घरी बोलवायला हवं, असं वक्तव्य राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलं आहे.
फक्त दलित व्यक्तीच्या घरी जाणं पुरेसं नाही. ही पद्धत दोन्ही बाजुंने असावी. ज्या प्रमाणे दलित लोक आपल्याला त्यांच्या घरी बोलावून आपलं स्वागत करतात. त्याचप्रमाणे आपणही आपल्या घरी त्यांचं स्वागत करायला हवं, असं वक्तव्य मोहन भागवत यांनी नुकत्याच झालेल्या संघाच्या एका बैठकीत केलं आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ग्राम स्वराज अभियानाचा भाग म्हणून काही आठवड्यांपूर्वी भाजपाच्या काही नेत्यांनी दलित समुहातील लोकांच्या घरी भेट दिली तसंच त्यांच्याबरोबर जेवणं केलं. सामाजिक सलोख्यासाठी भाजपाच्या नेत्यांच्या या भेटी होत्या. अष्टमीच्या दिवशी आपण दलित समुहातील मुलांना घरी बोलावून त्यांची पूजा करतो. पण आपण आपल्या मुलींना त्यांच्या घरी पाठवू का? असा प्रश्नही मोहन भागवत यांनी विचारला.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या दिल्ली युनिटचे सहअध्यक्ष आलोक कुमार यांनीही मोहन भागवत यांच्या वक्तव्यावर सहमती दर्शविली आहे. फक्त दलित लोकांच्या घरी जेवल्याने सामाजिक सलोखा निर्माण होणार नाही. समुहाच्या प्रगती आणि प्रतिष्ठेसाठीही काम करावं लागेल. दलितांच्या घरी जाण्याने ते लोक खुश होतील असं जर कोणाला वाटत असेल, तर तो पूर्णपणे अहंकार आहे. तुम्ही जर दलितांना तुमच्या कुटुंबाचा भाग मानत असाल तर हाच सामाजिक सलोखा आहे, असं आलोक कुमार यांनी म्हटलं.