संजय शर्मा नवी दिल्ली : मोदी सरकारमधील बहुतांश मंत्र्यांची राज्ये व त्यांच्या लोकसभा मतदारसंघांतून येणाऱ्या अहवालामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी चिंतेत आहेत. संसदेच्या सध्या सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या कालावधीत पंतप्रधानांनी काही मंत्र्यांना बोलावून आपापल्या लोकसभा मतदारसंघासाठी जास्त वेळ देण्याचे व लोकांचे म्हणणे ऐकून घेण्याचे निर्देश दिले आहेत.
पंतप्रधान मोदी हे वेळोवेळी आपल्या केंद्रीय मंत्र्यांबाबत अशा प्रकारचे सर्वेक्षण करतात. चिंतेचा विषय म्हणजे मोदींना आपल्याच सरकारच्या अनेक मंत्र्यांबाबत मिळणारे अहवाल समाधानकारक नाहीत. सन २०२४ च्या सार्वत्रिक निवडणुकीस आता एक वर्षाचा कालावधी उरला असला तरी पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या आपल्या सरकारचे मंत्री व भाजपच्या खासदारांना संकेतांतून सांगत आहेत की, त्यांनी आपल्या मतदारसंघासाठी जास्त वेळ द्यावा व लोकांच्या समस्या ऐकण्याबरोबरच त्यांनी टीका केली, तरीही ती ऐकून घ्यावी. काही मंत्र्यांना पंतप्रधानांनी सल्ला दिला आहे की, सरकारमधील मंत्र्यांकडून लोकांच्या जास्त अपेक्षा असतात. त्या पूर्ण न झाल्यास लोक नाराजही होतात.
उत्तर प्रदेश, दिल्ली, बिहार, झारखंडच्या काही खासदारांना मोदींनी बोलावून माजी केंद्रीय मंत्र्यांकडे जाऊन शिकण्यास सांगितले आहे. माजी केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद व प्रकाश जावडेकर यांच्याकडून विविध विषयांवर बोलण्याची कला शिकून घ्यावी, असेही सांगितले आहे.
जगदंबिका पाल यांचे दिले उदाहरणnसध्याच्या अधिवेशनाच्या कालावधीत पंतप्रधानांनी १२पेक्षा अधिक केंद्रीय मंत्र्यांना सावध केले आहे. अनेकजण मतदारसंघांत वेळ देत नाहीत. nकाही मंत्र्यांना तर मोदींनी ७३ वर्षांचे भाजप खासदार जगदंबिका पाल यांच्यापासून शिकण्यास सांगितले आहे. nजगदंबिका पाल हे एकमेव खासदार आहेत, जे अधिवेशनकाळात दररोज दिल्ली ते उत्तर प्रदेशातील आपला मतदारसंघ डुमरियागंजदरम्यान ये-जा करतात.
उत्तर प्रदेशातून ८० जागा जिंकण्याचे लक्ष्यपंतप्रधान उत्तर प्रदेशबाबत सर्वांत जास्त चिंतेत आहेत; कारण त्या राज्यातून यावेळी ८० जागा जिंकण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. तथापि, लोकसभा निवडणुकीसाठी अद्याप एक वर्ष बाकी आहे व सर्वेक्षणाच्या आधारावर केंद्रीय मंत्री आणि खासदारांचे तिकीट कापले जाऊ शकते. परंतु, पंतप्रधान मोदी आपल्या सरकारमधील मंत्री, खासदारांना स्थिती सुधारण्यासाठी सतर्क करीत आहेत.
कोण, किती जवळचा? nपंतप्रधान मोदी आपले मंत्री व खासदारांना अलीकडे देत असलेला सल्ला व संदेश महत्त्वाचा आहे. यामुळे काही मंत्री हवालदिल झाले आहेत, तर काही भाजप खासदार स्वत:साठी पंतप्रधानांचा पर्सनल टच मानत आहेत. nअर्थात, पंतप्रधान जेव्हा मंत्रिमंडळात फेरबदल करतील, तेव्हा कोणता मंत्री किंवा खासदार त्यांच्या किती जवळचा आहे, हे कळणारच आहे.
तुम्हीच प्रश्न विचारता, तुम्हीच उत्तर देता...एका ज्येष्ठ केंद्रीय मंत्र्याला तर पंतप्रधानांनी चांगलेच सुनावले. ते म्हणाले की, समोरच्याचा प्रश्नही न ऐकण्याएवढी तुम्ही गडबड करीत जाऊ नका. स्वत:च प्रश्न विचारत आहात व स्वत:च उत्तर देता, तर मग जनताही त्यांचे उत्तर देईल. या केंद्रीय मंत्र्यांची एक सवय आहे. त्यांना जो कोणी भेटेल त्याला ते म्हणतात, ‘कसे आहात. सर्व काही ठीक आहे?’