नवी दिल्ली : उत्तर ते ईशान्येकडील 12 राज्यांमध्ये स्वबळावर सरकार स्थापन करणारा भाजप आता दक्षिण जिंकण्याच्या मिशनसाठी तयारी करत आहे. यासाठी 'मिशन साऊथ' खास तयार करण्यात आले आहे. 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीपूर्वी तेलंगणा, केरळ आणि आंध्र प्रदेश या दक्षिणेकडील राज्यांमध्ये आपले नेतृत्व मजबूत करण्याची पक्षाची योजना आहे.
न्यू इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, भाजपच्या या उद्देशासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून ते गृहमंत्री अमित शहा, भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांच्यापासून महासचिव बीएल संतोषपर्यंत सर्व प्रमुख केंद्रीय आणि प्रादेशिक नेते सक्रिय झाले आहेत. न्यू इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, दक्षिणेत आपली स्थिती मजबूत करण्यासाठी भाजपने आपली आगामी राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक हैदराबादमध्ये घेण्याचा निर्णय घेतला आहे. ही बैठक 2 ते 3 जुलै दरम्यान होणार आहे. पहिल्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदीही बैठकीला उपस्थित राहणार आहेत.
नुकत्याच झालेल्या तेलंगणा दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राज्यातील टीआरएस सरकारवर कठोर भूमिका घेतली होती आणि त्यांच्यावर घराणेशाहीचे राजकारण केल्याचा आरोप केला होता. वृत्तपत्रानुसार, येत्या काही महिन्यांत भाजपचे अनेक मोठे नेते दक्षिणेला भेट देताना दिसणार आहेत. 14 मे रोजी गृहमंत्री अमित शाह यांनी तेलंगणातील रॅलीला संबोधित केले होते, त्यानंतर ते केरळला गेले होते. त्याचवेळी भाजपचे अध्यक्ष नड्डा हेही नुकतेच तेलंगणात गेले होते.
दक्षिणेत कर्नाटकच्या पुढे पाय रोवण्याचे भाजपचे प्रयत्न आतापर्यंत फारसे यशस्वी झालेले नाहीत. केरळमध्ये गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपने मेट्रो मॅन ई श्रीधरन यांना पक्षात घेत राज्यात सत्ता आणण्यासाठी प्रयत्न केला, पण फारसे यश मिळाले नाही. केरळ आणि तामिळनाडूमध्ये पुढील विधानसभा निवडणुका आता 2026 मध्ये होणार आहेत. पण कर्नाटक आणि तेलंगणामध्ये २०२३ मध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. तेलंगणात भाजपचे केवळ तीन आमदार आणि चार खासदार आहेत. तेथील आगामी निवडणुकीत टीआरएसला सत्तेतून पायउतार करण्याच्या योजनेवर भाजप काम करत आहे.