तिरुवनंतपुरम : लोकसभा निवडणुका एका भीषण हल्ल्याचे भांडवल करून नव्हे तर गरीबी, आरोग्याचे प्रश्न अशा महत्त्वाच्या मुद्द्यांवर लढल्या गेल्या पाहिजेत, असे काँग्रेसचे नेते शशी थरुर यांनी म्हटले आहे.थरूर म्हणाले की, पुलवामा हल्ल्यानंतर त्या गोष्टीचे भाजपाकडून लोकसभा निवडणुकांच्या प्रचारात भांडवल करण्यात येत आहे. लष्करी जवानांच्या हौतात्म्याला निवडणूकीचा मुद्दा बनवून भाजपाने प्रचार चालविला आहे. राष्ट्रीय सुरक्षा हा विषय निवडणुकांच्या केंद्रस्थानी आणला गेला आहे.पुलवामातील दहशतवादी हल्ल्यात ४० सीआरपीएफ जवान शहीद झाले होते. त्यावेळी देशातले सर्वच जण केंद्र सरकारच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले होते. मात्र त्यानंतर या हल्ल्याच्या मुद्द्याचे निवडणुकांत भाजपा भांडवल करत आहे अशी टीकाही शशी थरूर यांनी केली. पाकिस्तानवर भारताने केलेल्या हल्ल्यानंतर देशामध्ये भाजपाची लोकप्रियता आणखी वाढली, असा निष्कर्ष काही सर्वेक्षणांतून काढण्यात आला होता. तो मान्य करून थरूर म्हणाले की, तसे असले तरी खरे प्रश्न काय आहेत हे जनतेच्या निदर्शनास आणण्याचे कर्तव्य काँग्रेस बजावत राहाणारच.
पुलवामा हल्ल्याचे भाजपाकडून भांडवल - शशी थरुर
By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2019 5:10 AM