ज्या घरासाठी भाजपा आमदाराने अधिकाऱ्याला केली होती बॅटने मारहाण, त्यावर आता बुलडोझर चालणार
By ऑनलाइन लोकमत | Published: July 1, 2019 04:00 PM2019-07-01T16:00:03+5:302019-07-01T16:07:27+5:30
जुने घर तोडण्यासाठी आलेल्या अधिकाऱ्याला बॅटने मारहाण केल्याने भाजपा आमदार आकाश विजयवर्गीय यांना तुरुंगाची हवा खावी लागली होती.
इंदूर - जुने घर तोडण्यासाठी आलेल्या अधिकाऱ्याला बॅटने मारहाण केल्याने भाजपा आमदार आकाश विजयवर्गीय यांना तुरुंगाची हवा खावी लागली होती. मात्र जे घर वाचवण्यासाठी आकाश विजयवर्गीय यांनी एवढा आटापिटा केला होता त्या घरावर आता बुलडोझर चालणार आहे. आकाश यांनी पाडकामास विरोध केलेले हे जुनाट घर इंदूर महापालिका मंगळवारी पाडणार आहे.
26 जून रोजी इंदूर पालिकेचे अधिकारी सदर जुनाट घर तोडण्यासाठी आले होते. मात्र भाजपा आमदार आकाश विजयवर्गीय यांनी संबंधित आमदारांना मारहाण केली होती. तसेच या अधिकाऱ्यांवर विजयवर्गीय यांनी बॅटही उगारही होती. विजयवर्गी यांच्या या दंडेलशाहीचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित झाल्यावर आकाश यांच्यावर जोरदार टीका झाली होती. दरम्यान, जे जीर्ण घर वाचवण्यासाठी आकाश विजयवर्गीय यांनी एवढा आटापिटा केला त्या घरावर आता बुलडोझर चालणार असून, इंदूर महानगरपालिका मंगळवारी या घरावर कारवाई करणार आहे. हे घर पाडण्यासाठी रविवारी कारवाई करण्यात येणार होती. मात्र पुरेसा पोलीस फाटा न मिळाल्याने ही कारवाई पुढे ढकलावी लागली होती.
दरम्यान, आकाश विजयवर्गीय यांनी अधिकाऱ्याला केलेल्या मारहाणीबाबत आपल्याला पश्चाताप होत नसल्याचे म्हटले आहे. मात्र यापुढे महात्मा गांधींनी घालून दिलेल्या अहिंसेच्या मार्गानं चालण्याचा प्रयत्न करणार असल्याचेदेखील विजयवर्गीय यांनी सांगितले. इंदूर महापालिकेच्या अधिकाऱ्याला बॅटनं मारहाण केल्या प्रकरणी आकाश यांची तुरुंगात रवानगी करण्यात आली होती. न्यायालयानं शनिवारी त्यांच्या सुटकेचे आदेश दिले.