स्वपक्षीय मंत्री त्रास देत असल्यानं भाजपाच्या महिला आमदार विधानसभेत रडल्या
By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2018 04:30 PM2018-06-26T16:30:34+5:302018-06-26T16:31:34+5:30
भर विधानसभेत भाजप आमदाराची राजीनाम्याची धमकी
भोपाळ: मध्य प्रदेश विधानसभेतील भाजपाच्या महिला आमदारानं आपल्याच सरकारच्या मंत्र्यावर गंभीर आरोप केले आहेत. उद्योग मंत्री राजेंद्र शुक्ल आपल्याला त्रास देत असल्याचा आरोप भाजपा आमदार नीलम मिश्रा यांनी केला आहे. विधानसभेत याबद्दल बोलताना मिश्रा हुंदके देत रडू लागल्या. शुक्ल यांच्याकडून त्रास दिला जात असल्यानं सुरक्षा पुरवली जावी, अशी मागणीदेखील मिश्रा यांनी केली. यानंतर गृहमंत्री भूपेंद्र सिंह यांनी मिश्रा यांना सुरक्षा पुरवण्याचं आश्वासन दिलं.
राजेंद्र शुक्ल यांनी त्यांच्यावर करण्यात आलेले सर्व आरोप तथ्यहीन असल्याचं म्हटलं आहे. विधानसभेचं अधिवेशन सुरू असताना रिवा जिल्ह्यातील सेमरिया विधानसभेच्या आमदार नीलम मिश्रा यांनी राजेंद्र शुक्ला यांच्याकडून त्रास दिला जात असल्याचा आरोप केला. आरोप करताना त्यांना रडू कोसळलं. यानंतर त्यांना विधानसभा अध्यक्षांनी बसण्यास सांगितलं. यावेळी मिश्रा यांनी सुरक्षा देण्याची मागणी केली. सुरक्षा पुरवण्याचं आरक्षण दिल्यावरच खाली बसेन, असा पवित्रा त्यांनी घेतला.
राजेंद्र शुक्ल त्रास देत असल्याचा आरोप नीलम मिश्रा गेल्या अनेक दिवसांपासून करत आहेत. यावर बोलताना नीलम मिश्रांनी आमदारकीचा राजीनामा देण्याचीही धमकी दिली आहे. मिश्रा आणि शुक्ल यांच्यात जुना वाद असल्याचं सांगितलं जातं. मध्य प्रदेशचे मंत्री राजेंद्र शुक्ल आणि नीलम मिश्रा यांचे पती अभय मिश्रा यांच्या खूप जुना वाद आहे.