पाटणा-
बिहार विधानसभेत भाजपा आमदार लखेंद्र पाल पासवान यांना दोन दिवसांसाठी निलंबीत करण्यात आलं आहे. विधानसभेत बोलत असताना माईक तोडून टाकल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. सभागृहात विरोधकांनी घातलेल्या गोंधळावेळी आमदार लखेंद्र पाल यांनी संतापाच्या भरात माईक तोडून टाकला. यानंतर विधानसभा अध्यक्षांनी याची दखल घेत दोन दिवसांसाठी आमदार लखेंद्र पाल यांचं निलंबन केलं आहे. आता लखेंद्र पाल यांच्यावरील कारवाईच्या निषेधार्थ भाजपा आमदारांनी धरणे आंदोलन सुरू केलं आहे.
भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून मंगळवारी बिहार विधानसभेत प्रचंड गदारोळ झाला. या मुद्द्यावर विशेष चर्चेसाठी भाजपने स्थगन प्रस्ताव दिला होता. त्यावरून सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर भिडले. विरोधी पक्षनेत्यांनी सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांना भ्रष्ट म्हटल्यावर सत्ताधाऱ्यांनीही जोरदार विरोध केला.
इतकंच नाही तर भाजप आमदार लखेंद्र पासवान यांच्या एका प्रश्नादरम्यान चांगलाच गदारोळ झाला. तेव्हा भाजप आमदाराचा माईक बंद करण्यात आला. त्यामुळे गदारोळ होत असतानाच आमदारांनी स्वतःचा माईक तोडला. या गदारोळामुळे सभागृहाचं कामकाज लंच ब्रेकपर्यंत तहकूब करण्यात आलं. मात्र, त्यानंतरही या मुद्द्यावरून गदारोळ सुरूच होता.