देहरादून : जिल्हा न्यायालयाच्या आदेशानंतर सत्तारूढ भाजपचे आमदार महेश सिंह नेगी यांच्याविरुद्ध बलात्कार आणि जिवे मारण्याची धमकी दिल्याच्या आरोपावरून गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
भाजप आमदारावर बलात्कार, धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल आमदार नेगीने बलात्कार केल्याचा आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी एका महिलेने १६ आॅगस्ट रोजी तक्रार दिली होती.
तक्रारीत आमदाराच्या पत्नीचे नावही नमूद आहे, असे पोलिसांनी सांगितले. द्वारहाटचे आमदार नेगी हे माझ्या मुलीचे पिता आहेत. हे सिद्ध करण्यासाठी डीएनए चाचणी करण्यात यावी, अशी मागणीही तक्रारदार महिलेने केली आहे. तक्रारदार महिलेच्या याचिकेवर सुनावणी घेतल्यानंतर अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी यांच्या कोर्टाने एफआयआर दाखल करण्याचे आदेश दिल्यानंतर पोलिसांनी भादंवि कलम ३७६ आणि ५०६ तहत गुन्हा दाखल केला आहे. नेगीच्या पत्नीविरुद्धही जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
५ कोटी रुपये न दिल्यास खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिल्याची तक्रार आमदाराच्या पत्नीने या महिलेविरुद्ध दाखल केली होती. त्यानंतर या महिलेने तक्रार दाखल केली होती. अॅड. एस. पी. सिंह यांनी या महिलेच्या वतीने कोर्टात याचिका दाखल केली होती. कोर्टाने गुन्हा दाखल करण्याचे आदेश पोलिसांना दिले, असे सिंह यांनी सांगितले.